Join us  

२६ जुलैच्या महापुरात १०० गरजूंना मदत करणारा ‘देवदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 4:14 AM

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत ९२५ मिमी इतका महाप्रलयंकारी पाऊस पडला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. आज १३ वर्षांनंतरही या घटना आठवल्या की मुंबईकरांच्या काळजाचे ठोके चुकतात.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : २६ जुलै २००५ रोजी मुंबईत ९२५ मिमी इतका महाप्रलयंकारी पाऊस पडला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. आज १३ वर्षांनंतरही या घटना आठवल्या की मुंबईकरांच्या काळजाचे ठोके चुकतात. मात्र, २६ जुलै व २७ जुलै या दोन दिवशी पश्चिम उपनगरात अंधेरी ते मीरा रोडपर्यंत अडकलेल्या १०० गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करून स्वत:च्या गाडीने घरपोच सुखरूप पोहोचविणारे, गोरेगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष उदय चितळे हे देवदूत ठरले होते. आजही त्या क्षणांची आठवण झाल्यावर अंगावर काटा येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या आठवणी त्यांच्याच शब्दांत खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी...चितळे सांगतात, २६ जुलै २००५ रोजीच्या रात्री गोरेगाव पूर्व चेक नाक्याजवळील दूध सागर सोसायटीतून घराबाहेर पडलो. सिबा रोडवर एका कुटुंबाने मदतीसाठी हात दाखवला. मी गाडी थांबविली. त्यांनी म्हटले, ‘आम्ही जवळच राहतो; जरा घरी सोडा.’ ते कुटुंब तुफान पावसात अडकले होते. त्यांना सोडून मग मी दिंडोशी नाक्यावर पोहोचलो. बघतो तर अंधेरीकडे गाड्यांची रांगच रांग लागली होती. गाड्या सोडून माणसे रस्त्याच्या कडेला निवारा शोधत होती. तिथे गिटार घेऊन उभी असलेली काही माणसे दिसली. त्यांनीही मला हात केला. त्यांना गाडीत घेऊन फिल्मसिटी रोडला सोडले. ते आॅर्केस्ट्रामधले कलाकार होते व दिल्लीहून मुंबईत पोहोचले होते. विमानतळावरून निघून ते पावसात अडकले होते. त्यांना सोडून परत दिंडोशी नाक्याला आलो; जे भेटले त्यांना दिंडोशीतील नागरी निवारा, पिंपरीपाडा, फिल्मसिटी जिथे म्हणाले तिथे तिथे सोडले. शक्य झाले तितक्या नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. रात्री १२ वाजता घरी पोहोचलो. अंधारात बायकोचा लाल झालेला चेहेरा बघितला. काहीही न सांगता बाहेर गेल्यामुळे तिच्या मनात काळजीचे ढग दाटले होते. मुलीला आत्मविश्वास होता बाबा कुठेतरी कोणालातरी मदत करीत फिरत असणार.दुसरा दिवसही तसाच. साडू आमच्याकडे थांबले होते. त्यांना मालाड सबवेला सोडले. पुढे काय करायचे हे मनाशी ठरलेले होतेच. मालाडवरून सरळ हायवेला लागलो. वाटेत दोघे जण भेटले. त्यांना अंधेरीला सोडले व फ्लायओव्हर चढलो. तिकडे तरुणांच्या गटाने अडविले, म्हणाले, पुढे जाऊ नका. उलटे फिरा व या लोकांना मालाडला सोडा. मी म्हटले, बसा गाडीत. त्याच कामासाठी आजचा दिवस दिलाय. त्या लोकांना मालाडला सोडून पुढची फेरी अंधेरीकडे. पुन्हा गाडी भरली; आलो कांदिवलीला. पुन्हा गाडी अंधेरीकडे फिरवली. नंतर बोरीवली, मीरा रोडला प्रवासी सांगतील तिथे तिथे जात राहिलो. शेवटी जेव्हा थांबलो तेव्हा हिशोब संपला. या दोन दिवसांत एकूण शंभरएक गरजंूना त्यांच्या इच्छित स्थानी सोडले.- उदय चितळे सांगतात... जेव्हा जेव्हा मुंबईत जोराचा पाऊस पडतो, तेव्हा तेव्हा या १०० जणांना केलेली मदत आठवते; आणि आपण केलेल्या समाज कार्याबद्दल समाधान वाटते. मुंबईतील प्रत्येकजण धावपळीचे जीवन जगतो. त्यामुळे आसपास समाजात काय घडतेय, या बद्दल जाणून घेण्यास कोणालाच उत्सुकता नसते. प्रत्येकजण केवळ फायद्याच्याच गोष्टींत रस घेतो. मात्र, एका गोष्टीचा विचार करा, जर आपणावर कधीकाळी असा प्रसंग आला; आणि आपल्याला कोणीही मदत केली नाही तर कसे वाटेल? २६ जुलै सारख्या घटनेकडून बऱ्याच गोष्टी मुंबईकरांनी शिकल्या. शेजाºया शेजाºयात असणारे वैर संपुष्टात आले; कारण प्रसंगच असा होता, जीवापेक्षा या वेळेस वैर महत्त्वाचे नव्हतेच.

टॅग्स :मुंबई