Join us  

...आणि आम्ही ते विमान पाडले! सुहास गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 4:22 AM

भारताची सीमा अभेद्य राखण्यात शूर जवानांचा वाटा अनमोल आहे. महाराष्ट्राच्या पुत्रांनीही आपल्या असीम शौर्याच्या जोरावर वेळोवेळी शत्रूंना चीत केले आहे.

- चेतन ननावरेमुंबई : भारताची सीमा अभेद्य राखण्यात शूर जवानांचा वाटा अनमोल आहे. महाराष्ट्राच्या पुत्रांनीही आपल्या असीम शौर्याच्या जोरावर वेळोवेळी शत्रूंना चीत केले आहे. स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने अशाच काही युद्ध प्रसंगांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वायुदलातील अधिकारी सुहास गोडसे यांच्याशी केलेली ही खास बातचीत...सुहास गोडसे सांगतात, १९६६ साली माझी पोस्टिंग पंजाबला झाली. त्या वेळी जानेवारी १९७० मध्ये भर दुपारी अमृतसरनजीक तरनतारन या ठिकाणी रडारवर एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. ते खूप छोटे विमान होते. त्यामुळे रडार स्क्रीनवर ब्लिप दिसला. विमानाची साइज कळत नसली, तरी ते कोणत्या दिशेने चालले होते, याची माहिती मिळाली होती. त्याच्या वेगावरून कळाले की, ते लहान आकाराचे आहे.कोणतेही अनोळखी विमान आपल्या क्षेत्रात उडताना दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ही गंभीर बाब असते. नियमानुसार, आमच्या बेसवर ते विमान उडत असल्याने, भारतीय वायुदलातील हंटर विमान चालविणारे पायलट मोहन सामंत यांनी उड्डाण घेतले. त्यांच्यासोबत सिद्धू नावाचा आणखी एक पायलट होता. संशयित विमानाच्या वेगाच्या तुलनेत हंटर विमानाचा वेग खूपच जास्त होता. दोन ते तीन वेळा आपल्या हंटर विमानाने त्या संशयित विमानाशेजारून उड्डाण करत त्याला इशारा दिला. हंटर विमानाच्या वेगाने संबंधित विमान हवेतच अस्थिर होत होते, तरीही संबंधित वैमानिकाकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे संशयित विमान उडविण्याचा निर्णय पायलटने घेतला. त्याप्रमाणे, हवेतच विमानावर निशाणा साधून ते पाडण्यात आले.या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर दुपारी काही व्हीव्हीआयपी गाड्या आमच्या बेसवर धडकल्या. तसे आमच्या वरिष्ठांनी सर्व वैमानिकांना तत्काळ बेसवर बोलावले. त्या वेळी सर्वांसमोर खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी संरक्षणमंत्र्यांसह आल्या होत्या. सर्व वैमानिकांना उद्देशून बोलताना इंदिरा गांधी म्हणाल्या की, ‘आम्ही माध्यमांना काय सांगू याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. जर आपल्या बेसवर शत्रूचे किंवा संशयित विमान उड्डाण घेताना दिसले, तर कोणाचीही पर्वा करू नका. थेट विमान उडवा. बाकी सर्व आम्ही सांभाळून घेऊ.’त्या घटनेच्या काहीच वेळेनंतर रेडिओवर लाहोरची बातमी आली. लाहोरमधून एक विमान बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात येत होती. ट्रेनी पायलट रस्ता विसरल्यानंतर, भारताने क्रूरपणे विमान उडविल्याचे वृत्त देण्यात येत होते.मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे, तर त्या वैमानिकाने प्रोटोकॉल तोडला होता. आम्हाला दिलेल्या प्रोसिजरप्रमाणे आम्ही कारवाई केली होती. ग्रुप कॅप्टन दिलबाग यांनी सांगितले होते की, तुम्ही तुमचे कर्तव्य बजावा. कोणतेही परदेशी विमान तुमच्या प्रश्नांना उत्तर देत नसेल, तर तुम्ही पुढील कारवाई करताना कोणतीही भीती बाळगू नका.ही नोकरी नाही, तर धर्म!आजच्या तरुणांना सांगायला हवे की ही नोकरी नाही, तर धर्म आहे. ११ वर्षे सेवा केल्यानंतरही माझ्याकडे घर नव्हते. तरीही मी माझा संसार उभा केला. आज सेवानिवृत्तांना चांगला मोबदला मिळतो. तरीही शासनाने सेवेतून बाहेर जाणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याची गरज सुहास गोडसे यांनी व्यक्त केली. राजकारण्यांनीही याची काळजी घ्यावी, असेही गोडसे म्हणाले.

टॅग्स :बातम्याभारतीय हवाई दल