Join us

...अन् सोनेरी पाने उलगडली !

By admin | Updated: December 29, 2014 22:51 IST

लोकमत ही फार मोठी शक्ती आहे, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते, त्यामुळे ‘लोकमत’चे महत्त्व टिळकांच्या काळापासून आहे, असे सुबोध भावेने सांगितल्यावर एकच हशा पिकला.

लोकमत ही फार मोठी शक्ती आहे, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते, त्यामुळे ‘लोकमत’चे महत्त्व टिळकांच्या काळापासून आहे, असे सुबोध भावेने सांगितल्यावर एकच हशा पिकला. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा लोकमान्य टिळकांच्या आयुष्यावरील चित्रपट येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत आणि चित्रपटातील ‘लोकमान्य’ सुबोध भावे यांनी सोमवारी लोकमत कार्यालयाला भेट दिली होती. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून लोकमान्यांचे ज्वलंत आयुष्य आणि त्यांच्यावरील चित्रपटाची सोनेरी पार्श्वभूमीच उलगडत गेली. अमेरिकेत १० वर्षे राहून भारतात परतल्यावर खरे तर खूप नैराश्य आले होते. पाश्चिमात्य देश मात्र मूलभूत गोष्टींबाबत खूप विकसित आहेत. पण भारतात मात्र शिक्षण, नोकरी सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. शैक्षणिक-सामाजिक-राजकीय सर्वच क्षेत्रांत समस्या आहेत. त्यामुळेच आजच्या भारतीय तरुणांनी देशाच्या प्रगतीचा विचार करणेही खूप गरजेचे आहे. त्या काळात आगरकर आणि टिळकांनी समाजसुधारणा आणि स्वातंत्र्य याबाबत केलेले विचार आज आचारणबाह्य झाले आहेत. आज टिळकांनी मांडलेल्या विचारांची, बदलाची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे, असे मत चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने मांडले. ‘गीतारहस्य’ वाचून आमच्या टीमच्या आयुष्यात जो बदल घडला तोच लोकांमध्येही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. थोडक्यात गीतारहस्याचा फॉर्म्यूला चित्रपटात वापरला आहे, असेही ओमने सांगितले.ओमला टिळकांचा आवाका समजून घेण्यासाठी दीड वर्ष अभ्यास करावा लागला. आपल्याकडे टिळकांचे एकही व्हिडीओ फूटेज उपलब्ध नाही. मात्र लंडनच्या ब्रिटिश रॉयल म्युझियममध्ये त्यांच्या अंत्ययात्रेची क्लिप उपलब्ध आहे. आपल्याकडे जो टिळकांचा फोटो उपलब्ध आहे तोही त्यांच्या उतारवयातला. त्यामुळे त्यावरून टिळक कसे दिसत असतील याची संपूर्ण कल्पना येत नव्हती. त्यामुळे टिळक नेमके कसे दिसत असतील, याची कल्पना करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. अखेर मेकअपमन विक्रम गायकवाडच्या मदतीने टिळक साकारण्यात यश आले, असे ओम म्हणाला. सुबोध अभिनय करतोय असे कधीच वाटत नाही, त्याच्या सहज वावराने ती भूमिका जिवंत होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच सुबोधला घ्यायचे हे पक्के होते, असेही त्याने सांगितले. माझी ‘बालगंधर्व’मधील भूमिका पाहून शरद पोंक्षेंनी मला लोकमान्यांच्या जीवनावरील ‘दुर्दम्य’ ही कादंबरी भेट दिली होती. ती वाचल्यावर लोकमान्यांवर चित्रपट करण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. नेमके त्याच वेळी नीना राऊत याही लोकमान्यांवर चित्रपट करीत होत्या आणि त्यांनी लोकमान्यांच्या भूमिकेसाठी माझी निवड केली, हा अतिशय सुंदर योगायोग होता. त्यानंतर आम्ही एकत्र येऊन या चित्रपटावर काम केले, अशा शब्दांत सुबोध भावे यांनी ‘लोकमान्य’च्या निर्मितीची पूर्वपीठिका सांगितली. बालगंधर्वांना बालगंधर्व ही उपाधी ज्यांनी दिली त्या टिळकांवर चित्रपट करण्याची आज्ञाच जणू बालगंधर्वांनी दिली असावी, अशा शब्दांत सुबोधने त्याच्या भावना व्यक्त केल्या.बालगंधर्व काय किंवा टिळक काय दोन्ही व्यक्तिमत्त्वांची आब, पावित्र्य, वजन राखण्याचे मोठे आव्हान या भूमिका साकारताना होते. त्यातही मुळात या दोघांसारखाही मी अजिबात नाही. त्यामुळे अधिक परिश्रम घ्यावे लागले. अडीच-तीन वर्षे या चित्रपटावर काम करत होतो. सातारा-वाई, भोर, मुंबई या भागांत चित्रीकरण करण्यात आले. परंतु, या चित्रीकरणादरम्यानचा साकारण्यास सर्वात कठीण प्रसंग टिळकांच्या मुलाच्या मृत्यूच्या वेळचा होता. कारण मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतरही टिळकांनी आधी हातातला अग्रलेख पूर्ण केला होता आणि मग शोक. अश्रू आवरत हे साकारणे खरेच अवघड होते, असेही सुबोधने सांगितले.हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांमध्ये मोठा बदल घडवेल, असे नाही. परंतु, किमान तीन टक्के लोकांना जरी आम्ही सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करू शकलो, तरीही आम्ही जिंकलो. लोकांनी स्वत:मध्ये सकारात्मक बदल करण्यास सुरुवात केली, तरीही हेतू साध्य झाला, असे सुबोधला वाटते.च्शब्दांकन - भक्ती सोमण, संकेत सातोपे...आणि टिळकांची नजर मिळालीमी लोकमान्यांची भूमिका करतोय, हे जाहीर झाल्यानंतर एका प्रेक्षकाने पत्र लिहून प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदविली होती. ‘सुबोधचे डोळे फारच सौम्य आहेत. त्यात करारीपणा नाही, टिळकांची जरब नाही’, असे पत्रात म्हटले होते. त्यामुळे एक चीड उत्पन्न झाली आणि मग लोकमान्यांची ती नजर मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लोकमान्यांच्या प्रत्येक पुतळ्यात, प्रत्येक छायाचित्रात ती नजर मी शोधू लागलो आणि अखेर चित्रीकरणापर्यंत ती मिळालीच.- सुबोध भावे.काळ जिवंत झालाच्ऐतिहासिक चित्रपट करायचा म्हटल्यावर त्याचा काळ जिवंत करणे हे आव्हान होते. त्यासाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. म्हणजे त्या काळातले रस्ते डांबरी नव्हते. तेव्हा जिथे शूटिंग करायचे असेल त्या ठिकाणी दोन टँकर मातीचा रंग लावायला लागायचा. त्यानंतर त्यावर माती टाकून रस्ता तयार व्हायचा. मात्र इतर बाबींची विशेष काळजी ़घ्यावी लागली, मुंबईतील हॉर्निमल सर्कलला टिळक गेले होते, असे दृश्य चित्रपटात आहे. तेव्हा तिकडची झाडे छोटी होती. आता मात्र झाडे मोठी आहेत. तसेच आजूबाजूचा परिसरही सुधारला आहे. च्व्हीएफएक्स तंत्राचा उपयोग करून झाडं छोटी झाली, आजूबाजूचा परिसरही पूर्वी होता त्याप्रमाणे केला गेला. तर १९०७ सालचं न्यायालय, १९२३ साली कलकत्त्याला टिळक गेले होते तेव्हा शिडाच्या होड्या होत्या. हावडा ब्रिजही बांधला गेला नव्हता. त्यामुळे तो काळ जिवंत करण्यासाठी या तंत्राचा अवलंब केल्याचे सांगत शूटिंगदरम्यान १५० ते २०० जणांची टीम राबत होती. मात्र चित्रीकरण पूर्ण झाल्यावरही या तंत्रावर ९५ व्हीएफएक्स तंत्रज्ञ काम करत होते, असेही ओमने सांगितले.