Join us  

...आणि अख्खी कुंकूवाडी हादरली! परिसरात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 5:36 AM

विहीर अपघातात तीन वर्षांच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक प्रकाराने अख्ख्या कुंकूवाडीला हादरवून सोडले आहे.

गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : विहीर अपघातात तीन वर्षांच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक प्रकाराने अख्ख्या कुंकूवाडीला हादरवून सोडले आहे. रुईया बंगला राजेश रुईया यांच्या मालकीचा आहे. त्यांची पत्नी सीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभो, म्हणून विलेपार्लेमध्ये महिला गेल्या अनेक वर्षांपासून विहिरीवर ‘जितिया’ ही पूजा करतात. मंगळवारी संध्याकाळीदेखील ४ वाजल्यापासून ही पूजा सुरू करण्यात आली होती. काही वेळाने आवाज आला. माझी दोन मुले खाली धावली तर सासू ‘बचाव, कोई पुलीस को बुलाओ’ असे ओरडत घाबरलेल्या अवस्थेत आत आल्या. म्हणून मी बाहेर जाऊन पाहिले तेव्हा विहिरीचा स्लॅब कोसळून पूजा करणाऱ्या महिला विहिरीत गटांगळ्या खात होत्या.

वो हमेशा के लिए शांत हो गयी... ‘वो खिलखिलाती हमेशा के लिये शांत हो गयी, मै उसे अब कभी भी देख नही पाऊंगा...’ दिव्या या आपल्या तीन वर्षांच्या नातीचा फोटो दाखवत रिक्षाचालक अच्छेलाल यादव सांगत होते. कामावर जाताना ती धावत येऊन मला बिलगायची. मंगळवारी सकाळी तिला मी शेवटचे पाहिले. रिक्षा चालवत असताना मला घरून फोन आला. प्रसाद घेण्यासाठी दिव्या विहिरीवर चढली आणि स्लॅब तुटून विहिरीत पडली़आई आणि बहीण दोघांना गमावले...गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने मी त्या दिवशी घरीच होतो. तेव्हा मला माझा भाऊ विजय यादव याचा फोन आला. विहिरीचा स्लॅब तुटून आई आणि बहीण पाण्यात पडलेत, असे त्याने मला सांगितले. मी धावतच बंगल्याच्या दिशेने निघालो. आई जमुरत (४५) यांना सर्वांत आधी बाहेर काढण्यात आले होते. मात्र रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. तर मी पोहोचलो तेव्हा माझी बहीण रेणू (३५) हिला बाहेर काढले. मात्र उपचारापूर्वीच रेणूची प्राणज्योत मालवली होती, असे आई आणि बहिणीला गमावणारे वाहनचालक श्याम यादव यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई