Amit Shah's Uddhav Thackeray invites; Shivsena ministers will discuss the issue | अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण; शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत होणार चर्चा
अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण; शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत होणार चर्चा

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात एनडीएमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला महत्वाचे स्थान व खाती मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात  आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चर्चेसाठी उद्या दिल्लीत बोलावले आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळासह राज्य सरकारच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य मंत्र्याच्या समावेशाबाबत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या 26 तारखेला भाजपाचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व अमित शाह यांच्या भेट महत्वाची मानली जाते. गेल्या 17 फेब्रुवारी रोजी भाजपा व शिवसेनेत युती झाली. त्यानंतर गेली साडेचार वर्ष भांडणारे दोघे भाऊ गुण्यागोविंदाने राहू लागले आणि लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे 23 तर शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले, तर मुंबईत युतीने षटकार मारला. उद्धव ठाकरे यांचे मोदी व अमित शाह यांचे असलेले मधुर संबंध लक्षात घेता शिवसेनेला मोदी यांच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोदी यांच्या मावळत्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे अनंत गीते हे एकमेव मंत्री आहेत. त्यांच्याकडे अवजड उद्योगाचा कारभार देण्यात आला  आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी व राज्यसभा खासदार अनिल देसाई यांचा समावेश मोदी यांच्या मंत्रिमंडळात होणार होता. मात्र, विमानतळावरून मातोश्रीच्या आदेशाने त्यांना परत यावे लागले होते.

राज्यात शिवसेनेने 24 आणि भाजपाने 24 अशा लोकसभेच्या 48 जागा लढविल्या होत्या. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. मात्र,  आनंदराव अडसूळ, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील या अनुभवी खासदारांचा पराभव झाला. त्यामुळे आता मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत, भावना गवळी, गजानन कीर्तिकर यांच्यासह राहुल शेवाळे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पराभूत करून दुसऱ्यांदा निवडून येणारे अरविंद सावंत या संभाव्य नेत्यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. जर संजय राऊत यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यास त्यांना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा द्यावा लागेल असेही समजते.
 


Web Title: Amit Shah's Uddhav Thackeray invites; Shivsena ministers will discuss the issue
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.