मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेचे उत्तर कधीच हिंसेने दिले नाही; तर वैचारिक व सनदशीर मार्गाने त्यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. कितीही संकटे आली तरी डॉ. आंबेडकर यांनी कधीच आपला वैचारिक तोल जाऊ दिला नाही, याची आठवण न्या. अभय ओक यांनी शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या कार्यक्रमात करून दिली.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती उच्च न्यायालयात साजरी झाली. त्या वेळी न्या. ओक बोलत होते. ते म्हणाले, की महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा डॉ. आंबेडकर यांच्यावर केसरी व इतर वर्तमानपत्रांतून खूप टीका झाली. काही ठिकाणी तर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला.पण याचे उत्तर देण्यासाठी डॉ. आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी त्या वर्तमानपत्र कार्यालयांची तोडफोड केली नाही किंवा तेथे जाऊन काळे झेंडे दाखवले नाहीत. बहिष्कृत भारत या त्यांच्या वर्तमानपत्रातून डॉ. आंबेडकर यांनी या टीकेला उत्तर दिले. त्या वेळी त्यांनी लिहिलेल्या लेखात आपली बाजू अगदी खंबीरपणे व आग्रहीपणे मांडली. पण लेखात कोठेही भाषेचा तोल जाऊ दिला नाही. डॉ. आंबेडकर यांचे जीवनचरित्र नीट वाचले तर त्यांच्यासारखी वैचारिक लढाई कोणीही लढली नसावी हेच प्रखरतेने जाणवते, असेही न्या. ओक यांनी आवर्जून सांगितले.न्यायालयाच्या मुख्य इमारतीतील ४६ कोर्ट रूममध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या अतुलनीय कामगिरीमुळेच आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. एवढेच नव्हे, तर महिला न्यायाधीश अधिक असलेले मुंबई उच्च न्यायालय हे देशातील एकमेव न्यायालय आहे. मुंबई उच्च न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक आहे.या वेळी बोलताना अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर म्हणाले, की या तिन्ही महापुरुषांच्या देशप्रेमाला तोड नाही. कारण धर्मांतराच्या वेळी डॉ. आंबेडकर यांनी ‘मी प्रथम भारतीय आहे,’ असेच म्हटले होते. त्यामुळे देशापुढे कोणतीही जात किंवा धर्म मोठा नसतो याचा आदर्श या तिन्ही महापुरुषांनी आपल्या कामातून दाखवून दिला आहे. (प्रतिनिधी)
आंबेडकरांनी टीकेचे उत्तर हिंसेने दिले नाही!
By admin | Updated: April 19, 2015 00:32 IST