Join us  

'त्या' कर्मचाऱ्यांना लवकरच लोकल प्रवास करता येणार?; ठाकरे सरकारचं रेल्वेला पत्र

By कुणाल गवाणकर | Published: November 11, 2020 5:57 PM

रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता

मुंबई: सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. मात्र अद्याप तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरच लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या पत्रावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.'राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी आणि शिक्षकांसाठी शिक्षण विभागानं ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची सुविधा तात्काळ सुरू करण्यासंबंधीचं पत्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, निवारण आणि पुनर्वसन विभागानं रेल्वे खात्याला दिलं आहे,' अशी माहिती गायकवाड यांनी दिली. या पत्रावर रेल्वेनं सकारात्मक निर्णय घेतल्यास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळेल. त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल.सध्याच्या घडीला लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. याशिवाय सहकारी बँकांमधील १० टक्के कर्मचाऱ्यांनादेखीस लोकल प्रवासाची परवानगी आहे. गेल्याच महिन्यात राज्य सरकारनं महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली. त्यासाठी महिलांना क्यू आर कोडची गरज नाही. 

टॅग्स :मुंबई लोकल