Join us  

सर्व कोविड काळजी केंद्र पुन्हा होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:06 AM

रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची सावध पावलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने ...

रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची सावध पावले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने महापालिकेने सर्व कोविड काळजी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एका आठवड्याच्या कालावधीत ही केंद्रे सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, कोरोना काळजी केंद्रात ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. यापैकी सध्या १३ हजार १३६ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर ९७५७ खाटा राखीव आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बहुतांश कोविड काळजी केंद्र बंद करण्यात आले होते. तर सात जम्बो कोविड केंद्र आणि प्रत्येक विभागात एक असे एकूण २४ कोविड केंद्र ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होते. मात्र गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील ३० टक्के खाटांवर सध्या रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे बंद कोविड केंद्रे सुरू

करण्याबरोबरच जम्बो केंद्र अनिश्चित कालावधीपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत.

* खाटा व मनुष्यबळाचे नियोजन

बाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेला कळविणे, तसेच याबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर तत्काळ अपलोड करणे बंधनकारक आहे. सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात आवश्यक ते सर्व नियोजन तातडीने करावे. आयसीयू खाटा, ऑक्सिजन खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, औषधोपचार आदी सर्व संबंधित बाबींचे सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

* रुग्णांना दाखल करून घेण्याची जबाबदारी वॉर्ड वॉर रुमवर

कोरोनाची लागण झालेले व लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’वर असेल. त्याचबरोबर आपापल्या रुग्णालयातील कोविड खाटांच्या उपलब्धतेची माहिती सर्व रुग्णालयांना नियमित ‘वॉर्ड वॉर रुम’कडे कळवावी लागणार आहे.

* साधारण विभाग

एकूण खाटा... ११२०५

रुग्ण दाखल .... ३३२९

रिक्त खाटा .... ७८७६

* अतिदक्षता विभाग

एकूण खाटा... १५२८

रुग्ण दाखल .... ५६२

रिक्त खाटा .... ९६६

* ऑक्सिजन खाटा

एकूण खाटा... ६१७४

रुग्ण दाखल .... १४५२

रिक्त खाटा .... ४७२२

* व्हेंटिलेटर्स

एकूण खाटा... ९५९

रुग्ण दाखल .... ३६५

रिक्त खाटा .... ५९४

-------------------