संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त
नवी दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट
संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह पुण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे.
दिल्लीत इस्त्रायली दूतावासापासून १५० मीटर अंतरावर एक गाडी उभी होती आणि त्याच ठिकाणी हा स्फोट झाला. स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून, दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे, असे यात नमूद करण्यात आले आहेत.
त्यानुसार मुंबई पोलिसांनी नियोजन करीत कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच मुंबईतल्या संवेदनशील, तसेच अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. समुद्र किनारे, रेल्वे, तसेच विविध वाहतूक व्यवस्था, गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. सरकारी ठिकाणाजवळही पोलिसांची गस्त सुरू आहे. सोशल मीडिययावरील हालचालींवर सायबर पोलिसांचे लक्ष आहे. मुंबई पोलीस पाच हजार सीसीटीव्हीच्या मदतीने सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
.....