Join us  

मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक पाऊण तास उशिराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:06 AM

प्रवाशांना त्रास; कमी दृश्यमानता, मुसळधार पाऊस, वेगवान वाऱ्याचा फटका

मुंबई : मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सोमवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला. सकाळी ९.१२ ते ९.३१ या कालावधीत मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.

कमी दृश्यमानता, वेगवान वारे व मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून एकाही विमानाचे उड्डाण या कालावधीत होऊ शकले नाही अथवा एकही विमान धावपट्टीवर उतरू शकले नाही. परिणामी, सायंकाळी उशिरापर्यंत मुंबई विमानतळावरील वाहतूक सुमारे अर्धा ते पाऊण तास विलंबाने होत होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावरून प्रवास करणाºया हवाई प्रवाशांना विलंब, विमानांची उड्डाणे रद्द होणे याचा फटका बसत आहे.

ब्रिटिश एअरवेजचे बीए १३५ हे लंडनहून मुंबईला येणारे विमान हैदराबाद विमानतळावर वळवण्यात आले. तर, स्पाईसजेटचे एसजी ८७०१ हे दिल्लीहून मुंबईला येणारे विमान अहमदाबाद विमानतळावर वळवण्यात आले. ६ विमानांना गो अराऊंड करण्यात आले, इंडिगोची मुंबईत येणारी ३ विमाने व मुंबईहून उड्डाण करणारी ८ विमाने रद्द करण्यात आली, अशी माहिती मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.

टॅग्स :विमानतळ