Join us  

हवाई वाहतूक क्षेत्र हे भविष्यातील विकासाचे इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 5:50 AM

राज्यपालांना विश्वास : ग्लोबल एव्हिएशन परिषदेची सांगता

मुंबई : सातत्याने विस्तारत असलेले देशातील हवाई वाहतूक क्षेत्र देशाच्या भविष्यातील विकासासाठी इंजिन म्हणून कारणीभूत ठरेल, असा विश्वास राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी बुधवारी व्यक्त केला. ग्लोबल एव्हिएशन परिषदेच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री जयंत सिन्हा, सचिव राजीव चौबे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होते. यावेळी मेक इन इंडिया- नेक्स्ट जनरेशन एव्हिएशन हब या मिशन स्टेटमेंटचे प्रकाशन झाले.

राज्यपाल म्हणाले, जगातील हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ होत असून, २०३० पर्यंत यामध्ये १०० टक्के वाढ होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने वर्तविला आहे. पुढील दोन दशकांत देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत १.१२ बिलियन इतकी प्रचंड वाढ होईल, असा अंदाज हवाई वाहतूक मंत्रालयाने वर्तविला आहे. ही संख्या सध्या १८७ दशलक्ष आहे. या सर्व बाबींमुळे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ करावी लागणार असून, त्यामध्ये मोठी गुंतवणूक होणार आहे. यासाठी या क्षेत्रातील तांत्रिक माहिती असलेल्या व्यक्तींची मोठी गरज भासणार आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, देशातील प्रत्येकाची हवाई प्रवास करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रातील सर्व घटकांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत. हवाई क्षेत्राबाबत जाहीर करण्यात आलेले व्हिजन २०४० देशाच्या हवाई क्षेत्राचे धोरण असले तरी त्यामध्ये जागतिक पातळीवरील हवाई वाहतूक क्षेत्रावर परिणाम करण्याची क्षमता आहे, असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले, प्रभू यांनी अशा प्रकारची महत्त्वपूर्ण परिषद आयोजित करून अत्यंत कमी वेळात जगातील हवाई वाहतूक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून या क्षेत्राच्या विकासाबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे. या परिषदेमुळे या क्षेत्रासाठी रोडमॅप तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विमान, ड्रोन निर्मितीमध्ये देशाने मोठी कामगिरी करून जगात या क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.स्वप्नपूर्ती करणे शक्यशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी हवाई वाहतूक क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे मत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केले. जगाच्या एका देशातून भारतात तेथील उत्पादने आणून परतीच्या प्रवासात भारतातील शेती उत्पादने निर्यात करता येईल, याकडेदेखील त्यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले.

टॅग्स :विमानतळ