Join us  

वायू प्रदूषण : तर ८० टक्के मृत्यू टाळता येतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:05 AM

मुंबई : सध्याची प्रदूषण पातळी नव्याने जाहीर झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमी करण्यात यश मिळाल्यास पीएम २.५ शी संबंधित ८० ...

मुंबई : सध्याची प्रदूषण पातळी नव्याने जाहीर झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमी करण्यात यश मिळाल्यास पीएम २.५ शी संबंधित ८० टक्के मृत्यू टाळता येतील. अल्पकालीन ध्येय गाठल्याने नागरिकांच्या आयुष्यावरील आजारांचे ओझे कमी होईल. याचा परिणाम म्हणून पीएम २.५ चे प्रमाण आणि लोकसंख्या जास्त असलेल्या देशांमध्ये आरोग्यविषयक लाभ मिळू शकतील, असा दावा करण्यात आला आहे.

वातावरण बदलासह वायू प्रदूषण हा सुद्धा मानवी आरोग्याला हानीकारक असलेल्या अनेक घटकांपैकी एक आहे. वायू प्रदूषणाचे जे प्रमाण पूर्वी धोकादायक समजले जात होते. त्याहीपेक्षा कमी प्रदूषणाचाही मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य परिषदेच्या जागतिक हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांमधून समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी घातक प्रदूषकांचे आदर्श प्रमाण कमी करत हवा गुणवत्तेचे नवे निकष या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुचवण्यात आले आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास कोट्यवधी जीव वाचू शकतील. दरवर्षी वायू प्रदूषणामुळे अंदाजे ७ कोटी नागरिकांचे अवेळी मृत्यू होतात व त्यांच्या आयुष्यातील आरोग्यदायी कालावधी कमी होतो.

लहान मुलांच्या बाबतीत फुप्फुसाची वाढ आणि कार्य मंदावणे, श्वसन विषयक संसर्ग आणि गंभीर स्वरुपाचा दमा असे आजार जाणवू शकतात. प्रदूषणामुळे प्रौढांचे मृत्यू होण्यामागे हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका ही कारणे प्रामुख्याने आढळतात. मधुमेह असे परिणामही वाढताना दिसत आहेत. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांसोबत पौष्टिक आहाराचा अभाव आणि तंबाखूचे सेवन यामुळेही आजार वाढतात. वातावरण बदला सोबतच वायू प्रदूषण हा सुद्धा मानवी आरोग्यासाठी मोठा धोकादायक घटक आहे.

कार्बन उत्सर्जनात घट होईल

हवेची गुणवत्ता सुधारल्यामुळे वातावरण बदलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कार्बन उत्सर्जनात घट होईल. तसेच कार्बन उत्सर्जनात घट झाल्याने हवेची गुणवत्ता सुधारेल. नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास वातावरण बदलाचा परिणाम कमी करणे आणि आरोग्यविषयक सुरक्षितता या दोन्ही गोष्टी साध्य करता येतील.

नव्याने मर्यादा निश्चित

वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर सर्वाधिक दुष्परिणाम करणाऱ्या ६ प्रदूषकांसाठी परिषदेने नव्याने मर्यादा निश्चित केली आहे. पार्टिक्युलेट मॅटर – पीएम (घातक सूक्ष्मकण), ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड या पारंपरिक प्रदूषकांचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलल्यास त्याचा परिणाम वातावरणातील इतर प्रदूषकांवरही होईल.

१) १० मायक्रॉन्स आणि २.५ मायक्रॉन्स इतका आणि त्यापेक्षा कमी व्यास असलेले घातक सूक्ष्म कण (पीएम १० आणि पीएम २.५) यांच्याशी संबंधित आरोग्यविषयक जोखीम ही प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्याशी निगडित आहे.

२) पीएम २.५ आणि पीएम १० हे दोन्ही घातक सूक्ष्म कण फुप्फुसामध्ये खोलवर प्रवेश करू शकतात. यापैकी पीएम २.५ मध्ये रक्तप्रवाहात प्रवेश करण्याचीही क्षमता असते. याचा प्राथमिक परिणाम हृदय, रक्तवाहिन्या व श्वसनावर होतो. त्यानंतर इतर अवयवांवरही परिणाम होतो.

३) वाहतूक, ऊर्जा, घरगुती कामे, उद्योग, शेती या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या ज्वलनातून पीएम निर्माण होतात. जागतिक आरोग्य परिषदेने २०१३ साली वायू प्रदूषण आणि पीएम यांना कर्करोगास अनुकूल म्हणून जाहीर केले.