Join us  

कोरोनाशी लढण्यामध्ये एअर कार्गोचा मोठा हिस्सा, मालवाहतुकीवरील निर्बंध दूर करा, आयएटीए चे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 9:53 PM

कोरोनाशी लढण्यामध्ये एअर कार्गोचा मोठा हिस्सा, मालवाहतुकीवरील निर्बंध दूर करा, आयएटीए चे आवाहन

कोरोनाशी लढण्यामध्ये एअर कार्गोचा मोठा हिस्सा, मालवाहतुकीवरील निर्बंध दूर करा, आयएटीए चे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्यामध्ये हवाई मार्गेहोणाऱ्या मालवाहतुकीचा (एअर कार्गो)  मोठा हिस्सा आहे. जगभरातील कोरोना ग्रस्त देशांमध्ये हवाई मार्गे औषधे व इतर वैद्यकीय उपकरणे,  सामग्री पोचवण्यात येत आहे. मात्र सध्या अनेक देशांमध्ये हवाई वाहतुकीवर प्रतिबंध असल्याने इंटरनँशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)  ने याकडे लक्ष वेधले आहे. भारतात व जगातील अनेक देशांंमध्ये हवाई प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असली तरी हवाई मालवाहतुकीच्या द्वारे वैद्यकीय सहाय्यता मिळवली व दिली जात आहे. 

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर जगातील अनेक देशांत बंदी लादण्यात आल्याने हवाई मालवाहतुकीला जास्तीत जास्त वापरासाठी अनुकूल परिस्थिती तयार करुन देण्याची गरज आयएटीएने व्यक्त केली आहे. आयएटीए ने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांत आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले अनेक प्रवाशांनी त्यांचा हवाई प्रवास रद्द केला. परिणामी जगभरातील एक लाख 85 हजार पेक्षा जास्त उड्डाणे जानेवारी पासून मार्च पर्यंत रद्द झाली. त्यामुळे या विमानातून होणाऱ्या मालवाहतुकीला फटका  बसला. त्यामुळे हवाई मालवाहतूक करणाऱ्या फेऱ्यांच्या दरात मोठी वाढ झाली. 

जगभरात ज्या देशांमध्ये हवाई वाहतुकीवर निर्बंध लादलेले आहेत त्यामधून हवाई मालवाहतुकीला वगळण्यात यावे, जेणेकरुन वैद्यकीय सामग्री व इतर उपकरणांच्या वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. हवाई मालवाहतुक करणाऱ्या विमानांमधील जे केबिन क्रू सर्व  सामान्य नागरिकांशी संपर्कात येत नाहीत त्यांना 14 दिवस  सक्तीच्या  कॉरन्टाईनमधून वगळावे अशी भूमिका आयएटीए ने मांडली आहे. पार्किंग शुल्क, अतिरिक्त वजन असल्यास आकारले जाणारे दंडात्मक शुल्क, अशा बाबींमधून सद्य परिस्थितीत वगळण्यात यावे असे आवाहन आयएटीए ने जगभरातील सरकारांना केले आहे. मात्र , अनेक देशांमध्ये विमाने वैद्यकीय उपकरणे, औषधेयांनी भरलेली असतानाही केवळ विविध परवानगी व तांत्रिक अडचणींच्या नावाखाली विमानांना उड्डाण करण्यास परवानगी मिळण्यास मोठा विलंब होत आहे. प्रवासी विमानांमधून साधारण निम्मी मालवाहतूक केली जाते. मात्र जगभरातील जवळपास सर्व प्रवासी विमाने जमीनीवर असल्याने मालवाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. अनेक प्रवासी विमानांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बदल करुन मालवाहतूक केली जात आहे.