“मुंबईवर राग काढू नका”; उद्धव ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:04 PM2022-07-01T18:04:29+5:302022-07-01T18:04:55+5:30

Maharashtra Political Crisis: आरेमध्ये मेट्रोचे कारशेड करण्यावर पुन्हा एकदा आक्षेप घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

after uddhav thackeray statement deputy cm devendra fadnavis said on metro car shed issue that we will take an appropriate decision | “मुंबईवर राग काढू नका”; उद्धव ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

“मुंबईवर राग काढू नका”; उद्धव ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

googlenewsNext

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. यातच पहिल्याच मंत्रिमंडळ बैकठीत नव्या शिंदे सरकारने मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच होण्याविषयी राज्याच्या महाधिवक्त्यांना न्यायालयात बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्षेप घेतला. यावरून आता आरोप-पत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत कायम संघर्ष झाल्याचे दिसून आले आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपल्या मनातील भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्या पद्धतीने नवे सरकार स्थापन झाले आहे, त्याबाबतही रोखठोक मत व्यक्त केले. तसेच आरे कारशेड संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावर उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे. 

मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेऊ

आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे यांचा आदर आणि मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर बोलताना दिली. तत्पूर्वी, आरेमध्येच जेव्हा पुन्हा एकदा कारशेड होण्याबाबत निर्देश देण्यात आले. तेव्हा मला वाईट वाटले. आरेमध्येच कारशेड होण्याचा हट्ट धरू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. 

माझ्यावर राग काढा, मुंबईवर नको

माझ्यावर राग असला तरी चालेल. पण माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबई मेट्रोची आरे कारशेड ही पर्यावरणासाठी योग्य नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. ही जागा निश्चित करण्यात आली. तेव्हा एकाच रात्रीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. ही कारशेड झाली तर तेथील वन्यजीव आणि वनजीवनाला मोठा धोका निर्माण होईल. आता तेथे कारशेड झाल्यास ते पुढे पुढे वाढत जाईल आणि आरेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. पर्यावरणाच्या दृष्टिने विचार करूनच मुंबई मेट्रोची कारशेड आरेमध्ये नको, या निर्णय घेत माझ्या पहिल्या मंत्रिमंडळात यावर स्थगितील दिली होती. कांजूरमार्गची जागा अनेकार्थाने चांगली आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव नाकारू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरे येथे मेट्रोचे कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. तेथे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, शिवसेनेचा विरोध असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड होईल, असे निर्देश दिले. मात्र, या जमिनीवर केंद्र सरकारने दावा केला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. भाजपने याला कडाडून विरोध केला होता. यानंतर आता, आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशी माहिती देण्यात आली आहे. 
 

Web Title: after uddhav thackeray statement deputy cm devendra fadnavis said on metro car shed issue that we will take an appropriate decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.