नऊ वर्षांच्या संघर्षानंतर आंतरजातीय विवाह केला, पण पत्नीच सोडून गेली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 01:47 AM2019-08-03T01:47:06+5:302019-08-03T01:47:11+5:30

अवघ्या चार महिन्यांचा संसार; तरुणाने घेतली ताडदेव पोलिसांत धाव

After nine years of conflict, he got married, but his wife left! | नऊ वर्षांच्या संघर्षानंतर आंतरजातीय विवाह केला, पण पत्नीच सोडून गेली!

नऊ वर्षांच्या संघर्षानंतर आंतरजातीय विवाह केला, पण पत्नीच सोडून गेली!

Next

मनीषा म्हात्रे

मुंबई : महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना दोघांचे सूत जुळले. त्यांना लग्न करायचे होते; पण प्रेयसी उच्च जातीतील असल्याने तिच्या घरच्यांनी तिचे जबरदस्तीने अन्य मुलासोबत लग्न लावून दिले. तेथून पळ काढत ती प्रियकराकडे गेली. तिचा घटस्फोटही झाला. कुटुंबीयांनी लग्नास होकार द्यावा म्हणून दोघांनी तब्बल ९ वर्षे प्रयत्न केले. त्यांच्या जातीवाचक शिव्या, धमक्याही ऐकल्या. अखेर, सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांनी आंतरजातीय विवाह केला. मात्र, माहेरच्यांचे ऐकून अवघ्या चार महिन्यांतच ती त्याला सोडून गेली. त्याने पोलिसांत धाव घेतल्याने हे प्रकरण समोर आले.

एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे वाटणारी ही घटना मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरीस असलेल्या तरुणासोबत घडली. ताडदेव परिसरात राहणारा ३१ वर्षीय रोहन (नावात बदल) जुहू येथील एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ आहे. त्याचे त्या परिसरातील २७ वर्षीय नेहासोबत २०१० पासून प्रेमसंबंध होते. त्यांना लग्न करायचे होते. मात्र नेहा उच्च जातीची असल्याने तिच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. नेहाची आई एका इंग्रजी विद्यालयात शिक्षिका आहे. रोहनही उच्चशिक्षित, चांगल्या पदावर कार्यरत असताना केवळ जातीमुळे नेहाची आई लग्नास तयार नव्हती. तो लग्नाची बोलणी करायला गेला असता नेहाच्या कुटुंबाने जातीवरून शिवीगाळ करत त्याला घराबाहेर काढले. पुढे तिच्या नातेवाइकांकडून वेळोवेळी त्याला धमकावले जाऊ लागले. एप्रिल २०१५ मध्ये नेहाला उत्तर प्रदेशला गावी नेत, तिचे तेथेच अन्य मुलासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर १८ ते २० दिवसांनी रोहनला घरी बोलावून लग्नाची माहिती देत हिणवले. याबाबत तिच्या पतीला कळताच दोघांच्या प्रेमापुढे पतीने हार मानली. नेहाचा घटस्फोट झाला.

७ फेब्रुवारी २०१९ रोजी दोघांनी पळून जात कोर्टात विवाहासाठी नोंदणी केली आणि २८ फेब्रुवारी रोजी लग्न केले. मुलीच्या लग्नाला तिचे आईवडील उपस्थित नसल्याने रोहनने त्यांना वेळोवेळी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही.
लग्नानंतर पुढच्या काही महिन्यांतच माहेरच्यांनी नेहाला रोहनविरुद्ध भडकाविण्यास सुरुवात केली. ‘तुही खालच्या वर्गातील मुलाला जन्म देणार,’ असे टोमणे तिला मारले. त्यामुळे नेहाही बदलली. ‘तुझ्याशी लग्न करून मोठी चूक केली आहे, आईवडील सांगतात तेच खरे आहे,’ असे म्हणत तिनेच २९ जून रोजी रोहनविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. तिचे सर्व सामान घेत ती माहेरी निघून गेली. या प्रकाराने रोहनला धक्का बसला.

पोलीस तपास सुरू
ज्या मुलीसाठी शिव्या ऐकल्या, मार खाल्ला तीच सोडून गेल्याने रोहन खचला. परंतु, एवढे होऊनही नेहाच्या घरच्यांकडून त्याला शिवीगाळ सुरूच असल्याने अखेर, रोहनने ताडदेव पोलीस ठाण्यात २० जुलैला त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी सोमवारी रोहनच्या सासू-सासऱ्यांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार ताडदेव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: After nine years of conflict, he got married, but his wife left!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.