यांत्रिक सक्षमीकरणानंतर मोनोचे ‘डी रेल’ थांबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 04:00 AM2019-08-15T04:00:55+5:302019-08-15T04:01:07+5:30

 मोनो सुरू झाल्यापासून तिच्यामागे काही ना काही विघ्न लागले आहे. ते दूर करून मोनो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळत नाही. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.

After mechanical empowerment, the 'derail' of Mono will stop | यांत्रिक सक्षमीकरणानंतर मोनोचे ‘डी रेल’ थांबेल

यांत्रिक सक्षमीकरणानंतर मोनोचे ‘डी रेल’ थांबेल

Next

मोनो सुरू झाल्यापासून तिच्यामागे काही ना काही विघ्न लागले आहे. ते दूर करून मोनो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळत नाही. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.; पण हे सर्व टाळण्यासाठी प्रशासनाने यांत्रिक सक्षमीकरणावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी उच्च प्रतीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच वाढीव सुरक्षा, स्वतंत्र रेस्क्यू आॅपरेशन यंत्रणा, सुट्या भागांची उपलब्धता यावर भर द्यावा, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ या व्यासपीठावर व्यक्त केले.
 
वाढीव सुरक्षेसह स्वतंत्र रेस्क्यू आॅपरेशन यंत्रणा हवी
शहरातील अंतर्गत भागात जिथे रेल्वे पोहोचू शकली नाही तेथे मोनोरेल्वे सेवा उपलब्ध करण्याचा मूळ उद्देश होता. मात्र, घाईघाईने छोट्या अंतरावर मोनोची सुरुवात केली. प्रवाशांची मागणी, गरज विचारात न घेता हा प्रकल्प सुरू केला गेला. गरजेइतके गाडीचे डबे उपलब्ध नव्हते. त्यानंतर पुढील दुसऱ्या टप्प्याला अनपेक्षित दिरंगाई झाली. अशी मोनोरेल्वे उभारणीपासून तिच्यामागे संकटे येत आहेत. याशिवाय काही ठिकाणी मोनोचा मार्ग निमुळत्या व आखूड रस्त्यांवरून जातो. उंचावर स्थानके असल्याने मेट्रो, मोनो यांचा प्रवास उपनगरी रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना खास करून वृद्धांना थोडा जास्त त्रासदायक वाटतो. गाड्यांची संख्या सध्यातरी फारच कमी वाटते. मार्ग वळणावळणाचा असल्यामुळे गती वाढत नाही. मोनोने प्रवास केल्यावर घर किंवा कार्यालय गाठण्यासाठी रिक्षा, बस, टॅक्सी अशा दुसºया वाहनाची गरज भासते. तो खर्च मुंबईतील सर्व प्रवासीवर्गाला परवडणारा नाही, म्हणून स्थानके अशा ठिकाणी उभारावीत जेथे प्रवाशांना जाणे-येणे सोयीचे ठरेल. या मार्गावर बिघाड झाल्यास प्रवाशांना फार त्रासदायक ठरते त्यासाठी वाढीव सुरक्षा आणि स्वतंत्र रेस्क्यू आॅपरेशन यंत्रणा असावी. मोनोरेल्वेचा मुंबईची दक्षिण उत्तर व पूर्व पश्चिम टोके जोडणारा विस्तार पूर्ण झाल्यावर प्रदूषणविरहित थेट प्रवास करता येईल. त्या वेळी मुंबईकरांना मोनोरेल्वेची उपयुक्तता कळेल. त्यासाठी मोनोचा शक्य तितका विस्तार शीघ्रतेने पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना प्रवासाचा उत्तम पर्याय ठरेल असे वाटते.
- राजन पांजरी, जोगेश्वरी.

सुट्या भागांची उपलब्धता हवी!
खरे तर चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर धावणारी मुंबई मोनोरेल्वे ही भारतातील पहिली मोनोरेल्वे आहे; परंतु पहिल्या टप्प्यातील चेंबूर ते वडाळा काहीशी विरळ लोकवस्ती असलेल्या भागातून मोनो सुरू झाली. त्यामुळे मोनोला अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नसल्याने मोनो तोट्यात गेली. मात्र, वडाळा ते जेकब सर्कल असा भरवस्तीतील दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आणि मोनो रेल्वेला चांगले दिवस आले; परंतु सुरुवातीपासूनच मोनो रेल्वेला अपघातांचे ग्रहण लागले. कधी डब्यांना आग लागल्यामुळे सुरक्षेसाठी तिची सेवा बंद करण्यात आली तर कधी तांत्रिक बिघाडामुळे अनेक वेळा मोनोरेल्वे ठप्प झाली. ट्रॅकवर आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोनोसेवा बंद पडली आहे. तांत्रिक कारणास्तव सेवा बंद केल्याचे कारण एमएमआरडीएने दिले असले तरी सुटे भाग नसल्याने गाड्या नादुरुस्त झाल्यानंतर गाड्यांचा वापर होऊ शकत नसल्याने त्या यार्डात आहेत. यावर उपाय म्हणजे एमएमआरडीएने गाड्या नादुरुस्त झाल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी सुट्या भागांची व्यवस्था केली पाहिजे. एक मोनो गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी येण्यास २२ ते ४५ मिनिटांचा जो अवधी लागतो तो कमी केला पाहिजे, त्यासाठी मोनो गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे. - प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व),

तांत्रिक बिघाड दुरुस्तीला प्राधान्य द्यावे!
मोनो, मेट्रो हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत अशी सर्वांची इच्छा आहे; पण या सेवेतून प्रवास करण्यासाठी पुढे याचा भार किती वाढेल, याची कारणमीमांसा जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे. मोनोचे डबे रिकामे जात आहेत, ती तोट्यात आहे. अनेक भागामध्ये मोनो उभारण्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ हे फक्त स्वप्नातच दाखवायचे आहेत की काय? मोनो, मेट्रो हे सामान्य मुंबईकरांचेही स्वप्न आहे. मोनो, मेट्रो, सागरी प्रवास ही प्रवासाची साधने सर्वसामान्यांसाठी एक मृगजळ ठरू नये. मुंबईकरांची मोनो प्रवास वाहतूक सुसह्य करण्यासाठी सरकारने यातून काहीतरी चांगला तोडगा काढावा. यासाठी तांत्रिक बिघाड दुरुस्तीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
- कमलाकर जाधव, बोरीवली, मुंबई

भविष्यात प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार
मोनोरेल सुरळीत चालण्यासाठी आम्ही मोनोचे सुटे भाग घेत आहोत. यासाठी परदेशीऐवजी पुण्यातील कंपनीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्या कंपनीकडून आम्ही मोनोचे आवश्यक सुटे भाग मागविले असून त्यातून तीन मोनो सुरू करण्यात यश मिळाले आहे. उर्वरित मोनोही लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोनोरेल मार्गावर मोनोच्या फेºयांमध्ये वाढ करण्यासाठी आणखी नवीन मोनो घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मोनोच्या फेºया वाढल्याने भविष्यात प्रवाशांचा चांगली सुविधा मिळणार आहे. तसेच संपूर्ण मोनो मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांना स्थानकांवर बसण्यास आसने बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञान वापरावे
उपनगरी रेल्वेवर प्रचंड ताण पडत असल्याने मोनो रेल्वे हे एक प्रवासाचे चांगले साधन उपलब्ध झाले. यामुळे गर्दी विभागली जाऊन काही अंशी लोकलवरील ताण कमी झाला. भविष्यात अशा प्रवासी साधनांची अधिक गरज असल्याने आज मोनो/मेट्रोचे जाळे पसरले जात आहे; परंतु काहीतरी तांत्रिक बिघाड होऊन अनेकदा मोनो मध्येच बंद पडण्याने प्रवाशांची फरपट होण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रशासन सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. उच्च प्रतीचे वा आधुनिक तंत्रज्ञान वापरून या प्रकारांना आळा घालता येणे शक्य आहे वा अशा घटना कमी करता येणे शक्य आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. मोनोचे तिकीटदरही कमी व्हावेत, ही प्रवाशांची मागणी आहे, मोनोच्या फेºया वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. मोनो ही जलद, कमी खर्चाची, सुखकर व व्यत्यय विरहित असावी हीच प्रवाशांची माफक अपेक्षा आहे.
- मुरलीधर हरिश्चंद्र धंबा, डोंबिवली (पश्चिम)

मोनोचे रडगाणे अनाकलनीय
मुंबई महानगर परिक्षेत्रात दळणवळणाच्या मोठ्या समस्येला सामोरे जात असताना मुंबईकर दररोज हैराण होत आहेत. लोकलमधील जीवघेणी गर्दी, बेस्टची अपुरी बससेवा, सध्या उपलब्ध असलेली एकमेव घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा आणि वडाळा-चेंबूर मोनो रेल्वे सेवा हीच सार्वजनिक वाहतुकीची साधने. मात्र, मोनो रेल्वेचा पहिला टप्पा वडाळा ते चेंबूर सुरू होऊन पाच वर्षे उलटून गेली तरी ही सेवा अनेकदा विस्कळीत अथवा नादुरुस्तच राहिली. तर काही महिन्यांपूर्वीच वडाळा ते जेकब सर्कल असा दुसरा टप्पा सुरू केला गेला तरीही सेवाही सुरळीतपणे सुरू राहत नाही. अनेकदा कोचेसमधील बिघाड, दुरुस्तीसाठी सुटे भाग उपलब्ध न होणे आणि मोनोरेल्वे ‘डी रेल’ होणे हे नित्याचेच झाले आहे. मुंबईत दळणवळणासाठी साधनांची कमतरता आणि गरज असताना, मोनोरेल्वेचे नेहमीचेच रडगाणे अनाकलनीय वाटते. संबंधित यंत्रणांची मोनोरेल्वेच्या सुरळीत परिचालनासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आता मुंबईत मेट्रोचे अनेक प्रकल्प होऊ घातले आहेत. त्याचा नक्कीच फायदा मुंबईकरांना होईल. तेव्हा ‘मोनोरेल्वे’नेदेखील मुंबईकरांना पसंतीस उतरेल अशी सेवा देऊन प्रवाशांना आकर्षित करणे गरजेचे आहे.
- अनंत बोरसे, शहापूर, जिल्हा ठाणे.

दिरंगाई आणि चालढकलपणा नको!
मुंबई आणि परिसरात रेल्वेचे जाळे नाही तेथील भागात मोनोसेवा उभी करून जनतेला एक प्रवासाचे माध्यम द्यायचे या उद्देशाने मोनोची सुरुवात झाली. मार्गांची, स्थानकांची उभारणी करण्यापासून विघ्ने येत राहिली. गाड्यांचा पुरवठा, वाहतूक कंपन्या यामुळे अजूनही अडचणी कमी होत नाहीत. डब्यांचे दरवाजे अडकून बसणे, सिग्नल्समध्ये बिघाड, संकटसमयी सुटकेसाठीची व्यवस्था या कारणांबरोबर मागील पाच वर्षांत मोनो चालविलेला मार्ग हा शहरातील मुख्य ठिकाणच्या रस्त्यांना जोडला नसल्याने म्हणावी तशी प्रगती या मार्गावरील प्रवास करताना जाणवत नाही. वास्तविक इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढते प्रदूषण, वाहतूककोंडी यावर मोनोरेल्वे हा उत्तम उपाय आहे; परंतु त्याचा विकास आणि विस्तार यासाठी प्रशासन दिरंगाई आणि चालढकल करीत आहे म्हणून नफ्यातोट्याचा हिशेब न करत प्रस्तावित मोनोरेल्वे मार्ग पूर्ण करावा त्यामुळे सरकारबरोबर मोनीचीही विश्वासार्हता वाढेल. मोनो रुळावर येण्यासाठी तिच्या प्रवासातील सुरक्षितता वाढवावी, संकटकालीन बचाव व्यवस्था सदैव तत्पर ठेवावी. तसेच आकर्षक प्रवास दरांसारख्या सोयी उपलब्ध केल्यास प्रवासी संख्या वाढून प्रवास लोकप्रिय होईल यात शंका नाही.
- स्नेहा राज, गोरेगाव.

Web Title: After mechanical empowerment, the 'derail' of Mono will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.