Join us  

घरे जाहीर केल्यानंतरही ५३ लोकांचे बळी गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 1:26 AM

माहुल प्रकल्पग्रस्तांचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र

मुंबई : माहुल येथील वाढत्या प्रदूषणाचा त्रास दिवसागणिक वाढत असून, येथे पुनर्वसन केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतरणाबाबत सरकार काहीच निर्णय घेत नाही. परिणामी, माहुल प्रकल्पग्रस्तांचे हाल सुरूच असून, येथील एका प्रकल्पग्रस्ताने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीत आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ३०० घरे जाहीर केल्यानंतरही ५३ लोकांचे नाहक बळी गेले आहेत. याला कोण जबाबदार, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.माहुल प्रकल्पग्रस्त नंदू शिंदे (दादा) यांनी हे पत्र लिहिले असून, या पत्रात नंदू म्हणतात, याअगोदर भाजपचे सरकार होते. ते फक्त गुजराती-मारवाडी आणि धनाढ्य लोकांचे ऐकणारे सरकार होते. तिथे मराठी माणसाचे काही ऐकले जात नव्हते. तुम्ही माहुलचा विषय मांडला. तुम्ही लोकांना माहुलबाहेर काढून प्रदूषणमुक्त घर देण्याची भूमिका बजावत आहात. हे ऐकले. समाधान वाटले. त्याबरोबरच माहुल मुंबईचा भाग आहे, असेही तुम्ही म्हणालात. त्यासाठी कंपन्यांचे प्रदूषण कमी करण्याची गोष्ट बोललात. तर मी हे सांगू इच्छितो की, २०१५ सालचा राष्ट्रीय हरित लवादाचा अहवाल आहे. हा अहवाल म्हणतो, माहुल हे लोकवस्तीच्या दृष्टीने घातक आहे. हे माहीत असतानाही मुंबई महानगरपालिकेने २०१७ मध्ये लोकांचे पुनर्वसन माहुलमध्ये केले. असे असताना निरी संस्थेने तीन वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगण्यावरून परीक्षण केले. नंतर आणि प्रत्येक वेळेस प्रदूषण अधिक-अधिकच होत गेले.८ आॅगस्ट २०१८ रोजी झालेल्या स्फोटाने तर प्रत्यक्ष मृत्यू पहिला. आजाराने तर माहुल प्रकल्पग्रस्त त्रासलेच होते. ब्लास्टनंतर जीव मुठीत घेऊन हक्काचा निवारा सोडून आपल्या कुटुंबीयांना घेऊन त्यांनी जमेल तिकडे आसरा घेतला. शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दिलासा मिळेल या आशेवर लोक असताना आणि सरकारने आदेश दिले असताना महापालिका काहीच करीत नाही. चालढकल करून वेळ काढण्याचे धोरण सुरू आहे. लोकांचे जीव जात आहेत. ३०० घरे जाहीर केल्यानंतरही ५३ लोकांचे नाहक बळी गेले आहेत. याला कोण जबाबदार? लोकांचे जीव वाचावेत म्हणून तुम्ही सरसावलात; पण वाढत्या वेळेमुळे बळींची संख्या वाढतच आहे.मृत्यूचे तांडव थांबवा ही विनंतीआधीच माहुलची घरे मिळाल्यापासून लोकांचे खूप हाल झाले आहेत. तसाही खूप उशीर झाला आहे. कामात होणारा उशीर आमची गेलेली माणसे आम्हाला परत मिळवून नाही देणार. आमच्या माणसांसाठी उशीर होऊ नये आणि आणखी लोक प्रदूषणाचे शिकार होऊ नयेत. पर्यावरणमंत्री म्हणून तसेच एक उत्तम नेतृत्व म्हणून लवकरात लवकर लोकांचे सुरक्षित स्थलांतर करून मृत्यूचे तांडव थांबवा, अशी विनंती शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरे