Join us  

तासभर ब्लॉक लांबल्याने प्रवासी हैराण, ब्लॉकनंतरची पहिली लोकल २१ मिनिटे उशिराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 5:17 AM

मुंबईकरांना रविवार हा ‘ब्लॉक वार’ म्हणून परिचित आहे. या दिवशी करी रोड येथे लष्करी पुलासाठी आणि परळ येथील पुलाचे गर्डर टाकण्यासाठी, मध्य रेल्वेने ६ ते ८ तासांचा ब्लॉक घोषित होता.

मुंबई : मुंबईकरांना रविवार हा ‘ब्लॉक वार’ म्हणून परिचित आहे. या दिवशी करी रोड येथे लष्करी पुलासाठी आणि परळ येथील पुलाचे गर्डर टाकण्यासाठी, मध्य रेल्वेने ६ ते ८ तासांचा ब्लॉक घोषित होता. मात्र, पूल उभारणीच्या कामात विलंब झाल्याने ८ तासांचा ब्लॉक तासभर लांबला. यामुळे ८ तासांनंतर सुटणारी अप धिम्या मार्गावरील पहिली लोकल ३.३५ वाजता सुटण्याऐवजी ४ वाजून ३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना झाली.करी रोड येथे लष्करातर्फे शेवटच्या पादचारी पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. याच वेळी मध्य रेल्वेने परळ स्थानकात पुलाचा गर्डर यशस्वीपणे उभारला. या दोन्ही कामांसाठी मध्य रेल्वेने अप-डाउन धिम्या मार्गासह जलद अप मार्गांवर ६ तास आणि जलद डाउन मार्गावर ८ तासांचा ब्लॉक घोषित केला होता.ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी पहिली लोकल दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले होते. मात्र, पुलांच्या उभारणीचे काम लांबल्याने पहिल्या लोकलला तब्बल तासभर उशीर झाला. दादरहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी निघणार होती. मात्र, ही लोकल रद्द करण्यात आली. परिणामी, पहिली लोकल दादर फलाट क्रमांक ३ वर दुपारी ४ वाजून ९ मिनिटांनी दाखविण्यात आली. तथापि या लोकलला हिरवा सिग्नल नसल्यामुळे ही लोकल फलाटातून निघाली नाही. अखेर ४ वाजून ३० मिनिटांनी या लोकलला हिरवा सिग्नल मिळाला आणि ही रवाना झाली. परिणामी, ब्लॉक काळानंतर धावणारी पहिली लोकलही २१ मिनिटे उशिरा धावल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.८ तासांहून जास्त काळ दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. यामुळे लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ब्लॉक काळात सर्व लोकल वाहतूक कुर्ला आणि दादर स्थानकांपर्यंत सुरू होत्या. दादर स्थानकातूनच सर्व लोकलचा परतीचा प्रवास सुरू होत होता. दादरहून परळ, करी रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणा-या प्रवाशांनी बेस्टकडे धाव घेतल्याने, बेस्ट बसमध्ये जास्त गर्दी झाली. एकंदरीत रविवारची सुट्टी कुटुंबीयांसमवेत गेटवे, मरिन ड्राइव्ह येथे घालविणा-यांना, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ब्लॉकचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. बहुतांशी मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले, तर बाहेर पडलेल्या मुंबईकरांची गर्दीमुळे चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून आले.>सायन ते माटुंगा ३ नव्हे, ‘३० मिनिटे’ब्लॉक काळात सर्व लोकलचा वेग मंदावला होता. दादर-सीएसएमटी रेल्वे वाहतूक बंद असल्याने, प्रवाशांनी रस्ते मार्गे सीएसएमटी गाठण्याचे निश्चित केले होते. मात्र, रस्त्यांवरील वाहतूककोंडी पाहता, उशिरा जाईन, पण लोकलने प्रवास करेन, असा निश्चय काही प्रवाशांनी केला.माटुंगा येथे राहणाºया एल. के. अय्यर या प्रवाशाने सांगितले की, साधारणपणे सायन ते माटुंगा या अंतरासाठी रेल्वेने ३ ते ५ मिनिटे लागतात. मात्र, ब्लॉकमुळे हेच अंतर पार करण्यासाठी तब्बल ३० मिनिटांचा कालावधी लागला. रेल्वेने काम हाती घेतले आहे, ते प्रवाशांच्या भल्यासाठीच हे मान्य. मात्र, रेल्वेसारख्या जबाबदार प्रशासनाने ‘डेडलाइन’ न पाळणे हे अयोग्य आहे.>परळ स्थानकात १२ मीटर लांबीच्या पुलाच्या गर्डरचे काम लांबले. त्यामुळे नियोजित वेळेस म्हणजे, ३ वाजून ३५ मिनिटांनी पहिली लोकल सीएसएमटीकडे रवाना होऊ शकली नाही. हे काम त्वरित पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेने यशस्वी प्रयत्न केले. काही मिनिटांच्या अंतरानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :मुंबई