Join us  

अखेर अवकाळी पावसाचे सावट दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 6:37 AM

गेले तीन ते चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे जे सावट महाराष्ट्रावर होते ते आता दूर झाले

मुंबई/पुणे : गेले तीन ते चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे जे सावट महाराष्ट्रावर होते ते आता दूर झाले असून पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहिल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४१़२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गेले चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ त्यामुळे आंबा, द्राक्ष, कांदा पिकांची मोठी हानी झाली़ मध्य महाराष्ट्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आता विरले असल्याने पावसाचे सावट दूर झाले आहे़ त्याचवेळी पाकिस्तान व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, रायलसिमा, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात पुणे (लोहगाव) १०, औंढा नागनाथ, चाकूर ७, जालना, माहूर ५, परभणी १ मिमी पावसाची नोंद झाली होती़ राज्यात झालेल्या पावसामुळे कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे़ मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणचे कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते ४ अशांने घटले आहे़ मराठवाड्यातील कमाल तापमान २ ते ३ अंश आणि विदर्भातील कमाल तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे़ पुढील १८ ते २१ एप्रिल दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़