Join us  

अखेर ‘त्या’ विद्यार्थ्याचा प्रवेश राखीव जागेवरच होणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 6:07 AM

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास राखीव जागेऐवजी खुल्या प्रवर्गातून नोंद करण्यात आलेला हृतिक डोईफोडे या विद्यार्थ्याचा प्रवेश आता राखीव जागेवरच होणार असल्याची माहिती त्याला सीईटी कक्षाने दिली आहे.

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास राखीव जागेऐवजी खुल्या प्रवर्गातून नोंद करण्यात आलेला हृतिक डोईफोडे या विद्यार्थ्याचा प्रवेश आता राखीव जागेवरच होणार असल्याची माहिती त्याला सीईटी कक्षाने दिली आहे. शुक्रवारी ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत हृतिकने पुन्हा सीईटी सेलशी संपर्क साधला असता त्याला त्याचा प्रवेश राखीव जागेवरच होईल असे सांगण्यात आल्याची माहिती त्याने दिली. त्याबद्दल या विद्यार्थ्याने ‘लोकमत’ आणि स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे आभार मानले आहेत.नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) राखीव जागांवरून पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचा प्रवेश हा राखीव जागांऐवजी खुल्या प्रवर्गातून ग्राह्य धरण्यात येत असल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत. असे करून आमचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची भावना संतप्त पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये ‘जात प्रमाणपत्र नसल्याने प्रवेश खुल्या वर्गातून’ या शीर्षकाअंतर्गत शुक्रवार, दिनांक २० जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत सीईटी सेलने हृतिकला जातप्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती प्रवेशासाठी सादर करायला सांगितली आहे. त्यामुळे त्याचा राखीव जागेवरील प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे.हृतिक डोईफोडेप्रमाणेच आणखी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहेत. शासनाने याची तत्काळ दखल घ्यावी आणि मुदतवाढ द्यावी तसेच पावती सादर करण्यासंदर्भातील परिपत्रक काढावे, अशी मागणी स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे. यावर शिक्षणमंत्र्यांनी लवकर तोडगा पाडावा, नाहीतर आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.