Join us  

तब्बल ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पुन्हा रंगणार ‘डब्ल्यूटीए’चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:28 AM

तब्बल ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे मुंबईमध्ये पुनरागमन होत आहे. आगामी १८ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेचा थरार रंगणार

मुंबई : तब्बल ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे मुंबईमध्ये पुनरागमन होत आहे. आगामी १८ ते २६ नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेचा थरार रंगणार असून, जागतिक क्रमवारीतील नावाजलेल्या खेळाडूंसह भारताचे अव्वल महिला खेळाडू जेतेपदासाठी खेळतील.महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित, १ लाख २५ हजार अमेरिकी डॉलर इतकी एकूण बक्षिसाची रक्कम असलेली ही स्पर्धा क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे रंगेल. जागतिक क्रमवारीतील माजी द्वितीय खेळाडू रशियाची वेरा ज्वोनारेवा ही स्पर्धेतील मुख्य आकर्षण असली, तरी बेलारुसची १९ वर्षीय युवा आर्याना सबालेंकाला स्पर्धेत अव्वल मानांकन मिळाले आहे. जागतिक क्रमवारीत ७८व्या क्रमांकावर असलेल्या सबालेंकाला संभाव्य विजेती मानले जात असले, तरी अनुभवी ज्वोनारेवाचे कडवे आव्हान तिच्यासमोर असेल.१९ देशांच्या खेळाडूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत बीजिंग आॅलिम्पिक कांस्य पदक विजेती व जागतिक क्रमवारीतील माजी द्वितीय खेळाडू वोरा ज्वेनारेवाला दुसरे मानांकन लाभले आहे. ३३ वर्षीय ज्वेनारेवाला दुखापतीचा मोठा फटका बसला. २०१२ मध्ये जागतिक क्रमवारीत तिची मोठी घसरण झाल्यानंतर, खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ती २०१३च्या मोसमात खेळली नव्हती. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानापर्यंत मजल मारलेल्या बेल्जियमच्या यानिना विकमायेर हीदेखील जेतेपदासाठी प्रयत्न करेल.यजमान म्हणून भारतीय खेळाडू वाइल्ड कार्डद्वारे स्पर्धेत प्रवेश करतील. यामध्ये भारताची अव्वल एकेरी खेळाडू करमन कौर थंडी, माजी अव्वल खेळाडू अंकिता रैना, महाराष्ट्राची अव्वल मानांकित ऋतुजा भोसले आणि जागतिक ज्युनिअर क्रमवारीत १८व्या स्थानावर असलेली झील देसाई यांचा समावेश आहे.