Join us  

श्रींच्या आगमनापूर्वी खड्डे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 4:02 AM

श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावे, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल

मुंबई : श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावे, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल; याबाबतचे नियोजन करावे. गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले.बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व अन्य मंडळे तसेच बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासह विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमवेतच्या संयुक्त बैठकीत महापौर बोलत होते.बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षी श्रीगणेशोत्सव आगमनानिमित्त करण्यात येणारी तयारी भव्यदिव्य असते. देशभरासह जगातील लोक उत्साहाने यात सहभागी होतात. मुंबईतील गणेश मंडळाच्या वतीने समन्वय समितीने मांडलेल्या सूचनांचे निराकरण करणे हा मुख्य उद्देश बैठक आयोजित करण्यामागे आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरिकांसाठी तसेच त्यांच्या परिवारांसाठी गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणीच असून हा गणेशोत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन महापौरांनी केलेमहापालिका आयुक्त अजय मेहता म्हणाले, गणेश मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेला सहकार्य करावे. गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केले जाईल. गणेश मंडळांनी खड्ड्यांबाबत त्या त्या विभागाचे उपआयुक्त व साहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदविल्यानंतर लगेच खड्डे बुजविण्यात येतील. चौपाट्यांवर जेलीफिशचे प्रमाण बघता प्रशासनाकडून आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईबातम्या