Join us  

तावडेंवर मानसिक छळाचा गुन्हा दाखल करा - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 6:02 AM

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या परदेशी शिक्षणाच्या संधी हुकल्या आहेत. प्रचंड मानसिक तणावातून पालक आणि विद्यार्थी जात असताना मुलांच्या निकालाची चिंता न करता शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिका निवडणुकीचे निकाल चांगले लागण्याला प्राधान्य देत आहेत. ही चीड येणारी गोष्ट असून तावडे यांच्यावर मानसिक छळाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.ज्या खासगी कंपनीला शिक्षणमंत्र्यांची निकालाचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्याची पारदर्शीपणे चौकशी व्हायला हवी ,अशी मागणीही त्यांनी केली. आॅनलाईन अ‍ॅडमिशन बंद करा, अशी मागणी आपण सगळ्यात आधी केली होती पण ती यांनी मान्य केली नाही. आज कर्जमाफीसाठी शेतकरी आणि निकालासाठी विद्यार्थी सरकारच्या दुराग्रही आॅनलाईन हट्टापुढे हतबल झाल्याचेही ठाकरे म्हणाले. यापेक्षा तर या आधीचे सरकार चांगले होते. त्यांच्या काळात निकालांचे असे घोळ तरी झाले नव्हते असेही ते म्हणाले.तुमच्या पक्षाचेच रवींद्र वायकर हे शिक्षण राज्यमंत्री आहेत त्याचे काय? असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत. सगळ्या बैठकांचे मिनिट्स काढून पाहा, आमच्या राज्यमंत्र्यांनी वेळोवेळी सूचना केल्या, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.