Join us  

वेसावा कोळी सी फूडची आदित्य ठाकरेंकडून प्रशंसा; एक लाख मत्स्यप्रेमींनी दिली भेट!

By मनोहर कुंभेजकर | Published: January 24, 2023 4:36 PM

अखेरच्या दिवशी माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेसावे कोळी सी फूड फेस्टिव्हलला भेट दिली.

मुंबई : वेसावे कोळी सी फूड फेस्टिव्हलची सोमवारी मध्यरात्री यशस्वी सांगता झाली. तीन दिवसांत सुमारे एक लाख मत्स्यप्रेमी नागरिकांनी येथे भेट देऊन येथील कोळी संस्कृती आणि कोळी सी फूडचा मनमुराद आनंद लुटला.

अखेरच्या दिवशी माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या फेस्टिव्हलला भेट दिली. त्यांनी या फेस्टिव्हलची भरभरून प्रशंसा केली. त्यांना फेस्टिव्हलचे सहसेक्रेटरी महेंद्र लंडगे यांनी कोळी टोपी परिधान केली. यावेळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष भुनगवले, सेक्रेटरी नाशिकेत जांगले, उपाध्यक्ष देवेंद्र काळे, खजिनदार राजहंस लाकडे उपस्थित होते.

मी महाराष्ट्र बाहेर खूप फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतो, पाहतो. निरनिराळ्या कोळी आगरी मालवणी असे वैगरे खाद्य फेस्टिव्हल देखील मी पाहिलेले आहेत. मात्र वेसाव्यातील हा फेस्टिव्हल सगळ्याच दृष्टीने आगळा-वेगळा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, उत्साही आणि खमंग वातावरणामध्ये भूमिपुत्र कोळी समाजाने मत्स्य खवय्यांसाठी वाढून ठेवलेले मासे, या माशांच्या खमंग स्वाद, सुगंध हवेत दरवळत असताना कोळी भगिनीं बांधवांचा आदरपूर्वक उत्साह, सागर समुद्रातील संगीत असे वातावरण हे मी पहिल्यांदाच पाहात आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी वेसावकरांचे  कौतुक करून प्रशंसा केली. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या कोळी भूमिपुत्रांशी घनिष्ठ नाते होते. ते कधीच दुभंगले जाणार नसून शिवसेना आजही भूमिपुत्रांच्या पाठिशी आणि भूमिपुत्र शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, वेसावी गावातील सर्व संस्था मिळवून आयोजित करण्यात  येत असलेल्या या सी फूड फेस्टिवल मध्ये ठाकरेंसोबत माजी मत्स्य विकास मंत्री, आमदार असलम शेख हे देखील उपस्थित होते. मुंबईतील कोळीवाड्यांना, गावठाणांना सुविधा कशा द्याव्यात यासाठी आम्हां दोघा पालकमंत्र्यांची चढाओढ असायची असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याचबरोबर, आमदार असलम शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी दरवर्षी न चुकता या फेस्टिव्हलला येत असून नगरसेवक, आमदार, मंत्री अशी पदे भूषवित असताना देखील येत होतो आणि यापुढेही मी न चुकवता दरवेळी येत जाईन. या ठिकाणी मिळणारे ताजे मासे आणि कोळी बांधवांचे प्रेम हे मी विसरू शकणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या फेस्टिवलचे उद्घाटन प्राचार्य अजय कौल सर यांच्या शुभहस्ते झाल्यावर या फेस्टिव्हलला चालना देणारे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी अगदी उशिरापर्यंत थांबून सर्व स्टॉल धारकांशी सुसंवाद साधला. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई