Join us  

बेवारस वाहनांवर उथळसर प्रभाग समिती अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:13 PM

ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या बेवारस वाहनांवर आता पालिकेने कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार उथळसर प्रभाग समिती अंतर्गत आता अशा वाहनांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी १५ वाहने या प्रभाग समितीच्या माध्यमातून उचलण्यात आली आहेत.

ठाणे : ठाण्यात एकीकडे कोरोना नियंत्रणात येत असताना दुसरीकडे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरात स्वच्छतेची मोहीम देखील हाती घेतली असून या मोहीमेसोबतच शहरात ठिकठिकाणी अनाधिकृतपणे पार्क केलेल्या बेवारस गाड्यांवर ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उघरला आहे. यामध्ये आतापर्यंत ठाण्यातील शेकडो वाहनांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली असून या सर्वाना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही अनेकांनी आपली वाहने न उचल्याने उथळसर प्रभाग समिती अंतर्गत अशा वाहनांवर कारवाई सुरु झाली आहे. त्यानुसार या मुदतींनंतर येथील १५ वाहने उचलण्यात आली असल्याची कारवाई सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.                    पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले असून संपूर्ण शहरभर नऊ प्रभाग समिती अंतर्गत व्यापक स्वरूपात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र शहराला बकाल स्वरूप आणणाऱ्या वाहनांवर देखील कारवाईचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असल्याने सध्या अनाधिकृतपणे पार्क केलेली बेवारस वाहने सध्या पालिकेच्या रडारवर आहेत. एकाच वेळी नऊ प्रभाग समतिीमध्ये ही कारवाई करण्यात आली असून सर्वाधिक ४६८ नोटीस या उथळसर प्रभाग समितीच्या अंतर्गत बेवारस वाहनांना बजावण्यात आल्या असून त्यानंतर ७० नोटिसा या कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत बजावण्यात आल्या आहेत. तर ६० नोटिसा या लोकमान्य- सावरकर नगर प्रभाग समितीच्या अंतर्गत बजावण्यात आल्या आहेत. इतर प्रभाग समितींमध्ये मात्र तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असून या प्रभाग समितींमध्ये अशाप्रकारच्या वाहनांचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान उथळसर प्रभाग समिती अंतर्गत आता येथील वाहनांवर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी येथील ४६८ पैकी १५ वाहने उचलण्यात आली आहेत. ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाआयुक्त