Join us  

रक्त तुटवडा रोखण्यासाठी आता कृती आराखडा, राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:57 AM

सामान्यत: मे महिन्यात आणि आॅक्टोबर महिन्यात रक्ताचा तुटवडा भासतो. मात्र, यावर वेळीच तोडगा काढण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना दिले आहेत.

मुंबई : सामान्यत: मे महिन्यात आणि आॅक्टोबर महिन्यात रक्ताचा तुटवडा भासतो. मात्र, यावर वेळीच तोडगा काढण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना दिले आहेत. आॅक्टोबर महिन्यातील रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी, उपाययोजनांंबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत.आॅक्टोबरमधील रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी, जिल्हा स्वैच्छिक रक्तदान समितीची बैठक आपल्या स्तरावर आयोजित करण्यात यावी. जिल्हा स्वैच्छिक रक्तदान समितीच्या सर्व सदस्यांना या महिन्यात रक्ताची कमी भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे परिषदेने निर्देश दिले आहेत.शिवाय, मुंबईतील रक्तपेढी प्रमुखांनीदेखील याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना परिषदेने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.उन्हाळ्यातील रक्ताच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, ज्याप्रमाणे सामाजिक संस्था, धार्मिक संस्था व इतर धर्मादायी संस्था इ. मार्फत विशेष स्वैच्छिक रक्तदान शिबिरे तातडीने आयोजित केली जातात, त्यानुसार, आॅक्टोबर महिन्यासाठी अशा उपाययोजना करण्यात याव्यात, असे परिषदेने म्हटले आहे. आता कृती आराखड्याद्वारे रक्त तुटवड्यावर मात करण्यात येणार आहे.- शहरात दरवर्षी साडेतीन लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज असते. शिबिरांच्या माध्यमातून रक्त गोळा होत असले, तरी ते वाया जात असल्याने त्या रक्ताला किंमत उरलेली नाही.

टॅग्स :मुंबई