Join us

भाव कमी न केल्यास कारवाई

By admin | Updated: July 15, 2016 03:25 IST

मिलमधून प्रक्रिया होऊन बाहेर पडलेल्या मुगावर तब्बल ९७ टक्के, मूगडाळीवर ९० टक्के, मसूरडाळीवर ७७ टक्के आणि तूरडाळीवर ४८ टक्के किमती वाढवून विक्री केल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

अतुल कुलकर्णी,  मुंबईमिलमधून प्रक्रिया होऊन बाहेर पडलेल्या मुगावर तब्बल ९७ टक्के, मूगडाळीवर ९० टक्के, मसूरडाळीवर ७७ टक्के आणि तूरडाळीवर ४८ टक्के किमती वाढवून विक्री केल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने मॉल व्यवस्थापनाची बैठक घेऊन तातडीने भाव कमी करा, नाहीतर कारवाईला सामोरे जा, अशा शब्दांत सुनावले आहे.डाळविक्रीतील नफेखोरीने टोक गाठल्याने त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न एका संस्थेने केला. त्यांनी विविध ठिकाणांहून डाळी विकत घेतल्या व दरातील प्रचंड फरक दाखविणाऱ्या पावत्याच एफडीएच्या अधिकाऱ्यांपुढे सादर केल्या. त्यानंतर एफडीएचे प्रधान सचिव महेश पाठक, उपसचिव सतीश सुपे आणि अव्वर सचिव प्रवीण नलावडे यांनी मॉलमध्ये विक्री करणाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीला रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अक्षय काळे, आदित्य बिर्ला रिटेल लि.चे गोपाळ नाईक, हायपरसिटी रिटेल इंडिया लि.च्या संपदा गाडगीळ आणि फ्यूचर रिटेल लि.चे सुनील साळगावकर हजर होते. मात्र रिलायन्स, बीग बझार, डीमार्ट असे मोठे मॉलचालक हजर नव्हते. डाळींचे दर कमी करा नाहीतर प्रशासन कठोर कारवाई करेल, असे त्यांना सांगण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.डाळी प्रक्रिया केल्यानंतर खुल्या बाजारात विक्रीसाठी जेव्हा जातात तेव्हा पॅकिंग आणि रॅपिंगच्या नावाखाली मॉलचालक प्रचंड नफा कमावतात. यावर उपाय म्हणून आता ग्राहक संरक्षण कायद्यातच बदल करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. तूरडाळीचा मुंबई आणि नागपूरमधील दर तपासून घेतल्यानंतर मुंबईत चढ्या दराने डाळ विकली गेल्याचेही समोर आले आहे. जी तूरडाळ घाऊक बाजारपेठेत १२४ रु. ५० पैसे दराने विकली गेली, तीच तूरडाळ नागपुरात १२९ रुपये तर मुंबईत १५० रुपये दराने किरकोळ बाजारात विकली गेल्याचे समोर आले. त्यामुळे डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात, त्यांना नफेखोरी करण्यापासून रोखावे, गरज पडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने केल्या आहेत.एसी मॉलमध्ये हातात ट्रॉली धरून ऐटीत आपण किती मस्त खरेदी करतोय हे दाखविणारा एक वर्ग तयार झाला, त्यातून त्यांचा आणि किराणा दुकानदारांचा संबंधच संपला. मॉलमध्ये स्वस्त मिळते या धारणेवर उभारलेल्या मॉलचालकांनी कधी खिसे कापणे सुरू केले हेही लोकांना कळाले नाही. एसी आणि ट्रॉलीच्या मोहाची किंमत किती जबरदस्त आहे हे आता तरी लोकांना कळेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.