Action against seventeen thousand delivery boys in Mumbai | मुंबईतील सतरा हजार डिलिव्हरी बॉइजवर कारवाई
मुंबईतील सतरा हजार डिलिव्हरी बॉइजवर कारवाई

मुंबई : ऑनलाइन मागविलेले खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणाऱ्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढत असल्याने, त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांमध्ये स्विगी, उबेर इट, झोमॅटो, डॉमिनोज पिझ्झाच्या १६,९०८ डिलिव्हरी बॉइजना चलन आणि दंड आकारला आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी मार्च ते आॅक्टोबर, २०१९ दरम्यान अनधिकृत पार्किंग, विना हेल्मेट वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, वेगात वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आदी गुन्ह्यांसाठी ही कारवाई केली आहे. स्विगी, उबेर इट, झोमॅटो, डॉमिनोज पिझ्झा आदी खाद्यपदार्थ आॅनलाइन मागविण्यात येतात. हे खाद्यपदार्थ लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉइजमध्ये स्पर्धा लागते. ग्राहकाला लवकरात लवकर डिलिव्हरी मिळावी, तसेच जास्तीत जास्त डिलिव्हरी करावी, यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. प्रत्येक डिलिव्हरीसाठी कंपनीकडून कमिशन दिले जाते. जास्त डिलिव्हरी करून जास्त कमिशन मिळविण्याकडे त्यांचा कल असतो. कमिशनसाठी अनेकदा ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.
डिलिव्हरी बॉईजकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून तक्रारी येत असतात़ त्याची दखल घेत पोलीस कारवाई करतात. कित्येक वेळा हे डिलिव्हरी बॉईज कारवाई करत असलेल्या पोलिसांसोबत वाद घालतात, असे पोलिसांनी सांगितले. बेशिस्त डिलिव्हरी बॉइजना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मार्चपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. नियमभंग करताना पुन्हा आढळल्यास यापेक्षा कठोर कारवाई होणार आहे़
<स्विगीच्या डिलिव्हरी बॉयची संख्या जास्त
मार्च ते आॅक्टोबर या कालावधीत १६,९०८ डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजनी सर्वात जास्त वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. स्विगीच्या ६,९३६, त्यापाठोपाठ झोमॅटो’५,४२०, डॉमिनोज पिझ्झाचे २,७८३ तर उबेर इटच्या १,७६९ डिलिव्हरी बॉईजवर कारवाई करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Web Title: Action against seventeen thousand delivery boys in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.