Join us  

बेशिस्त ७७ हजार चालकांवर कारवाई

By admin | Published: January 31, 2015 2:35 AM

दरवर्षीप्रमाणे सरकारतर्फे देशभरात रस्ता सुरक्षा अभियान चालविले जाते. यंदा रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करताना विविध उपक्रम देशभरात राबवीत

मुंबई - दरवर्षीप्रमाणे सरकारतर्फे देशभरात रस्ता सुरक्षा अभियान चालविले जाते. यंदा रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करताना विविध उपक्रम देशभरात राबवीत वाहनचालकांना शिस्तीचे धडे देण्यात आले. मुंबईतही वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांसाठी अनेक उपक्रम राबवितानाच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाईदेखील केली. या कारवाईत तब्बल ७७ हजार ९८ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. यात नो पार्किंग, विनाहेल्मेट आणि सिग्नल तोडण्याच्या सर्वाधिक घटनांचा समावेश आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ११ ते २५ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविताना ६४९ ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले; तर २६८ ठिकाणी वाहनचालकांचे परिसंवाद, ७७४ स्कूलबसचालकांना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षणही देण्यात आले. त्याचप्रमाणे ८२ शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांसंदर्भात माहितीही देण्यात आली.हे अभियान राबविताना रस्ता सुरक्षा पंधरवडाअंतर्गत वाहतूक विभागामार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाईही करण्यात आली. यात तब्बल ७७ हजार ९८ बेशिस्त चालक वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. सर्वाधिक कारवाई ही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर करण्यात आली असून, १६ हजार ७१२ चालकांना पकडण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त बी.के. उपाध्याय यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नो पार्किंगसारख्या ठिकाणी वाहने उभे करणाऱ्या १६ हजार ६९२ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. तर सिग्नलचे नियम न पाळणारे ९ हजार ५२६ चालक वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)