Join us  

अपघातग्रस्त सुदीपने मागितले १८ लाख

By admin | Published: January 27, 2015 11:21 PM

बेस्ट सेलर कांदबरीकार सुदीप नगरकर यांच्या पायावर पालिकेच्या वीजेचा पोल पडून झालेल्या अपघातात, ते जखमी झाले

ठाणे : बेस्ट सेलर कांदबरीकार सुदीप नगरकर यांच्या पायावर पालिकेच्या वीजेचा पोल पडून झालेल्या अपघातात, ते जखमी झाले असून या अपघातातून अजूनही ते सावरलेले नाहीत. या घटनेला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांनी पालिकेकडे १८ लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. पाचपाखाडी भागात आपल्या मित्रा बरोबर गप्पा मारत असतांना त्यांच्या पायावर वीजेचा पोल पडला. यावेळी पोलवर बॅनर लावण्यासाठी शिडी लावण्यात आली होती. यामुळे वजन न पेलवल्याने तो खाली पडला. यावेळी जो इसम बॅनर लावत होता, तो देखील किरकोळ जखमी झाला़ मात्र त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर जखमी झालेल्या सुदीप यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे़ मात्र, डॉक्टरांनी त्यांना सहा आठवड्यांची विश्रांती सांगितली आहे. परंतु त्या अपघातातून ते आजही सावरले नसून त्यांचे मानसिक संतुलन खालावले आहे. त्यामुळे त्यांनी आता महापालिकेकडे १८ लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात त्यांच्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन हैद्राबाद, दिल्ली, वडोदरा, अहमदाबाद आदी ठिकाणी होणार होते. परंतु डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितल्याने त्यांना या सोहळ्यासाठी जाता येणार नाही. या सोहळ्याची संपूर्ण तयारी आधीच झाली होती. परंतु आता तो सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यासाठी जाता येणार नसल्याने या कार्यक्रमाचा ५ लाख, औषधी व आॅपरेशनचा तीन लाख आणि मानसिक संतुलन खालावल्याचे १० लाख असे मिळून एकूण १८ लाखांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, महापालिका आयुक्त संजय जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त, विद्युत विभागाचे प्रमुख आदींना या संदर्भातील पत्र दिले आहे. तसेच यापुढे अशी घटना घडू नये म्हणून पालिकेने आताच खबरदारी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)