Join us  

...तर अपघातांचे प्रमाण ९० टक्क्यांनी कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:40 AM

महामार्गावरील अपघात, वाहनांची कोंडी आणि ते टाळण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना, उपक्रमाबाबत आर. के. पद्मनाभन यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांच्याशी सविस्तरपणे मते मांडली.

वाहनांचे अपघात मग ते महामार्गावरील असोत की शहरातल्या रस्त्यांवरचे. बहुतांश वेळा ते मानवी चुकांमुळे होत असतात. वाहन चालविताना चालकाने ज्ञान, नियम आणि काळजी या तीन बाबी कटाक्षाने पाळल्या आणि लेन कटिंग करण्याचे टाळल्यास, रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांनी कमी होईल, असे स्पष्ट मत महाराष्टÑ राज्य वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केले. महामार्गावरील अपघात, वाहनांची कोंडी आणि ते टाळण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना, उपक्रमाबाबत आर. के. पद्मनाभन यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत वरिष्ठ प्रतिनिधी जमीर काझी यांच्याशी सविस्तरपणे मते मांडली.सुरक्षित व अपघात विरहित वाहतुकीसाठी प्रामुख्याने कोणत्या बाबींची गरज आहे?रस्त्यांवर होणाºया अपघातांपैकी ९० टक्क्यावर अपघात हे मानवी चुकांमुळे होतात, त्यामध्ये वाहनातील तांत्रिक त्रुटी, खराब रस्ता याचे प्रमाण क्षुल्लक असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना देण्यापासूनची प्रक्रिया अधिक कठोरपणे वापरली पाहिजे. आरटीओकडून एका छोट्या जागेत एका दिवशी शेकडो, हजारो जणांची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जात असेल, तर त्यामध्ये काय तपासणी होणार? शहरापासून दूर असलेल्या विस्तीर्ण व निर्जन ठिकाणी चाचणीसाठी पाचारण केले पाहिजे. प्रत्येक उमेदवारांचे सूक्ष्मपणे निरीक्षण झाले पाहिजे, तरच चालकाला त्याबाबत गांभीर्य वाटेल. तामीळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये बाहेरच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली जाते. जोपर्यंत त्यांना गाडी चालविण्यासाठी आवश्यक ज्ञान, नियम व काळजी याबाबत पूर्णपणे अवगत होत नाही, एका लेनवरून ड्रायव्हिंग आणि इंडिकेटर वापराबाबतचे महत्त्व समजत नाही, तोपर्यंत त्यांना लायसन दिले जाऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.महामार्गावरील वाहतुकीतील समस्या व अपघाताची कारणे काय आहेत?राष्टÑीय महामार्ग क्रमांक-४ वरील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे नवी मुंबईतील कळंबोलीपासून सुुरू होऊन, पुण्यातील सोमाटणे फाटा येथे संपतो. त्याची एकूण लांबी ९४ किलोमीटर असून, त्यातील घाट भाग १९ किलोमीटर आहे. या मार्गावरून रोज सरासरी २२ ते २५ हजार हलकी व ४ ते ५ हजार अवजड वाहनांची ये-जा होत असून, दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामध्ये घाट भागात अरुंद मार्ग असल्याने वाहतुकीची कोंडी होते. अमृतांजन पुलाजवळ केवळ २ लेन आहेत. घाटात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक एकत्र आल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्याचप्रमाणे, अपघात होण्यामागील प्रमुख कारणे ही वेगाने वाहन चालविणे, सिग्नल न देता लेन कटिंग करणे, रस्त्यात इंडिकेटर न देता वाहन थांबविणे, त्याचप्रमाणे काही वेळा दरड कोसळणे, क्रॅश बॅरियर्स व डिव्हायडरची उंची कमी असल्याने वाहने ओलांडणे आणि मार्गावर येणाºया जनावरांमुळे काही वेळा अपघात घडतो.अपघात टाळण्यासाठी कोणते उपाय राबविले जात आहेत?बहुतांश अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होतात. खूप कमी वेळा वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा संबंधित रस्ता कारणीभूत ठरत असतो. अनेकांना वाहन चालविण्याचे पुरेसे ज्ञान असत नाही. उदाहरणार्थ, गाडी चौथ्या गियरमध्ये असताना अचानक ब्रेक मारतात. त्यामुळे नियंत्रण ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे, मागून येणाºया वाहन चालकही गोंधळून जातो. इंडिकेटरचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्यावर जादा भर दिला जात आहे. त्यासाठी अदृश्य पोलीस, गोल्डन अवर्स ही संकल्पना राबविली जात आहे. त्याचप्रमाणे, जाळीचे कुंपन तोडणाºयांवर स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी आणि एक्स्प्रेस वे वर मोटार सायकलस्वारांवर मज्जावासाठी दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याशिवाय, व्हेरिएबल मेसेज बोर्ड बसविण्याचे काम ‘एमएसआरडीसी’कडून सुरू आहे. ई-चलान, स्पीड गन ही प्रक्रिया कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडून खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.महामार्गावर वाइन शॉपला केंद्राने निर्बंध घातल्याने, अपघाताच्या प्रमाणात काय फरक पडला?वाहन चालकाकडून अनेक कारणामुळे चुका होऊन अपघात घडू शकतो. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ हे त्यापैकी एक प्रमुख कारण असले, तरी निव्वळ दुकानांवर बंदी घातल्याने, त्याला प्रतिबंध होऊ शकत नाही. दारूचे व्यसन असणारा ती कोठूनही उपलब्ध करू शकतो. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वरील कारवाईच्या प्रमाणावरून समजू शकतो. मात्र, आणखी काही कालावधीनंतर त्याबाबत ठोसपणे सांगता येईल.टोल नाक्यावर वाहनांच्या लांबवर लागलेल्या रांगा?महामार्गावरील टोल नाक्यावरील होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यावरील बुथ वाढविणे, तसेच इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे तिकीट देऊन टोल वसूल करावी, तसेच मोबाइल अ‍ॅप विकसित करून टोल स्वीकारण्याची पद्धत कार्यान्वित करण्यासाठी आयआरबीच्या अधिकाºयांना दिल्या आहेत.बंद पडलेल्या वाहनांमुळे होणारी कोंडी कशी सुटेल?द्रुतगती महामार्गावर बंद पडणारी वाहने, नजीकच्या एक्सिट पॉइंटपर्यंत विनामूल्य घेऊन जाण्याची जबाबदारी आयआरबी कंपनीची आहे. त्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून २ के्रन वापरल्या जातात. मात्र, वाहनांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने, आणखी किमान ६ मोठ्या क्रेन घेण्याबाबत आयआरबी आणि एमएसआरडीसीच्या अधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीत सूचना केल्या आहेत. त्यामध्ये २ हिप्पो क्रेन बोरघाट चौकी व एक हिप्पो क्रेन खालापूर येथे कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रस्ताव आहे.‘गोल्डन अवर्स’ ही संकल्पना काय आहे?‘एक्स्प्रेस वे’वर शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वाहनांची प्रचंड गर्दी होते. ती टाळण्यासाठी ‘गोल्डन अवर्स’चा वापर केला जातो. त्यामध्ये गर्दीच्या वेळी विशेषत: सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ७ ते १० या वेळेत थ्री एक्सेल, मल्टी एक्सेल, ओडीसी वाहनांना विशिष्ट ठिकाणी अडविण्यात येते. जेणेकरून, लहान वाहने सुरळीत व जलदपणे पुढे जाऊ शकतात. वाहनांची कोंडी टळते. गेल्या वर्षात केवळ ख्रिसमसच्या वेळी ‘एक्स्प्रेस वे’वर वाहनांची मोठी कोंडी होण्याची एकमेव घटना घडली होती. त्या वेळी अमृतांजन पुलाजवळ झालेल्या अपघातामुळे हा प्रसंग उद्भवला होता.महामार्गावरील वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवणे शक्य आहे का?सुरक्षित वाहतुकीसाठी यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञान व सामुग्रीचा वापर आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी पहिल्यांदा सर्व वाहने, त्यांचे क्रमांक आणि वाहनधारकांचा ‘डाटा’ एकत्रपणे संकलित असणे गरजेचे आहे. अनेकदा बनावट नंबर प्लेट वापरली जाते, त्यामुळे त्यासंबंधी इत्यंभूत माहिती उपलब्ध असेल, तर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे बेशिस्त वाहनचालकांना चाप लावता येऊ शकेल. त्यामुळे या उपकरण सामुग्रीबरोबर माहितीचे संकलन करणे अत्यावश्यक आहे.महाराष्टÑात एकूण ‘ब्लॅक स्पॉट’ किती आहेत?केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील सर्व प्रकारच्या मार्गांवरील अपघात होणाºया अशा ठिकाणाचा शोध घेण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण ७३४ ‘ब्लॅक स्पॉट’ मिळाले आहेत. त्यानुसार पोलीस, पीडब्ल्यूडी, स्थानिक प्रशासन व विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे मोहीम राबवून, या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबतचा अहवाल बनविण्यात आला आहे. त्यांच्या कार्यवाहीबाबत शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाईल.अदृश्य पोलीस संकल्पना काय आहे?महामार्गावर ड्रायव्हिंग करताना, अनेक जण बेशिस्तपणे वाहन चालवून स्वत:चा व इतराचाही जीव धोक्यात घालतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी ‘एक्स्प्रेस वे’वर विविध ठिकाणी आमचे कर्मचारी साध्या वेशात गस्त घालत असतात. नियमाचे उल्लंघन करणाºया वाहनाचा क्रमांक टिपून घेतला जातो. वाहनचालकाला त्याची कल्पनाही येत नाही. मात्र, महामार्गावरील पुढील चौकीत याबाबत तातडीने माहिती दिली जाते. त्या वेळी तेथील पोलिसांकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये प्रामुख्याने वेगाने वाहन चालविणे, पहिल्या लेनमधून जाणारी अवजड वाहने, इंडिकेटर न देता लेन कटिंग करणारे, रस्त्यावर मध्येच थांबविल्या जाणाºया वाहनांवर कारवाई केली जाते. खालापूर, उर्से व कुसगांव टोल नाक्यांवर ही कारवाई करण्यात येते. २४ तास ठरावीक ठिकाणी ही योजना कार्यान्वित असल्याने, एक्स्प्रेस वे वरील वाहनांची कोंडी व अपघातांच्या प्रमाणात घट झालेली आहे. एक्स्प्रेस वे वर पळस्पे, बोरघाट, वडगाव व खंडाळा या ४ ठिकाणी २०१७ मध्ये अशा प्रकारे एकूण १ लाख ८६ हजार ६२४ वाहनांवर केसेस करून, त्यांच्याकडून ४ कोटी ३१ लाख ७६ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे. २०१६च्या तुलनेत हे प्रमाण ८३,१६० व दंडाची रक्कम २ कोटी ७२ लाख ९४ हजार ९२० इतकी अधिक आहे.

टॅग्स :मुंबई