Join us

एसी लोकलचे काम वेगात

By admin | Updated: July 27, 2015 02:20 IST

पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणाऱ्या एसी लोकलचे काम चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) सध्या जोमाने सुरू आहे

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणाऱ्या एसी लोकलचे काम चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) सध्या जोमाने सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात ही लोकल दाखल होणार असून, तब्बल ४५ कोटी रुपये एका लोकलची किंमत आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत नव्या बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेत टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. अशा ७२पैकी ३ लोकल सध्या दाखल झाल्या असून, उर्वरित लोकल २0१६ सालच्या डिसेंबर महिन्यापर्यंत येतील. याचबरोबर एसी (वातानुकूलित) लोकलही पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. ही लोकल बारा डब्यांची असणार असून, सुरुवातीला चर्चगेट ते बोरीवली या मार्गावर जलद म्हणून चालवण्याचा विचार केला जात आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही लोकल मुंबईत दाखल होईल, असे याआधीच रेल्वेमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. त्यादृष्टीने या लोकलचे काम आयसीएफ फॅक्टरीत जोमाने केले जात असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. लांब पल्ल्याच्या अन्य गाड्यांप्रमाणेच या लोकलच्या अन्य डब्यांतही जाता येईल, अशी व्यवस्था असेल. या एसी लोकलचे भाडे मात्र सध्या मुंबईत धावणाऱ्या लोकलपेक्षा जास्त असेल, अशी माहिती देण्यात आली.