एसी लोकल आजपासून धावणार; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दाखवला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:08 AM2020-01-31T06:08:52+5:302020-01-31T06:09:03+5:30

गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

AC Local will run from today; Minister of State for Railways Suresh Angadi showed a green flag | एसी लोकल आजपासून धावणार; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दाखवला हिरवा झेंडा

एसी लोकल आजपासून धावणार; रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दाखवला हिरवा झेंडा

Next

मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील पहिल्या एसी लोकलला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी गुरुवारी हिरवा झेंडा दाखविला. मात्र ही उद्घाटनाची फेरी नियोजित वेळेपेक्षा १७ मिनिटे उशिराने धावली. परिणामी एसी लोकलच्या फेरीमुळे या मार्गावरील इतर लोकल विस्कळीत झाल्या.
गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. पनवेलहून दुपारी ३.३० वाजता सुटणारी एसी लोकल दुपारी ३.४७ वाजता सुटली. उद्घाटनाचा कार्यक्रम उशिराने सुरू झाल्याने संपूर्ण वेळापत्रक बिघडले. परिणामी या लोकलला १७ मिनिटांचा उशीर झाला. याप्रसंगी राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, खासदार अरविंद सावंत, खासदार मनोज कोटक, पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री आदिती तटकरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल उपस्थित होते. पहिली एसी लोकलच्या मोटरवूमन मनीषा म्हस्के आणि महिला गार्ड श्वेता गोने या होत्या.
या वेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी म्हणाले की, मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आलो आहे. पूर्वी मुंबईतील स्थानकांवर अस्वच्छता पसरली होती. मात्र आता सर्व स्थानके स्वच्छ दिसून येत आहेत. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी ५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
शिष्टाचार पाळा
एसी लोकल आणि इतर पायाभूत सुविधांचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मुंबई, ठाणे, रायगड येथील सर्व खासदारांचे नाव मुख्य बॅनरवर नव्हते. त्यामुळे सावंत यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

या प्रकल्पाचे उद्घाटन
घाटकोपर आणि कामण रोड स्थानकात नवीन तिकीट घर, एलटीटी, पनवेल स्थानकात डिलक्स शौचालय, चुनाभट्टी आणि कोपर स्थानकातील फलाटांची सुधारणा, भायखळा व दादर स्थानकात एचव्हीएलएस पंखे, सीएसएमटी स्थानकात सोलर पॅनल, २० रेल्वे स्थानकांत मोफत वायफाय आणि दादर व ठाणे स्थानकात आधुनिक सूचना फलक या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, वसई रोड, नालासोपारा, मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड, अंधेरी, गोरेगाव आणि मध्य रेल्वे मार्र्गावरील खर्डी, वासिंद, आंबिवली, आटगाव, आसनगाव या स्थानकांतील पादचारी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. जोगेश्वरी स्थानकातील पादचारी पुलाचा विस्तार झाला, त्याचेदेखील उद्घाटन करण्यात आले.

Web Title: AC Local will run from today; Minister of State for Railways Suresh Angadi showed a green flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे