मुंबई : अनधिकृत झोपड्या उभारणारे भूमाफिया शहरातील अनेक ठिकाणी सरकारी जागा गिळंकृत करत असताना आता आरे कॉलनीतील रॉयल पाम कॉम्प्लेक्सलगतच्या मोकळ्या जागेलाही झोपडीदादांनी लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसांत येथे तब्बल दोनशेहून अधिक झोपड्या उभ्या राहिल्या असून दिवसेंदिवस यात भर पडत आहे. संबंधित यंत्रणा याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मरोळ येथून रॉयल पाम कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या होत्या. गेल्या काही वर्षांत या मार्गावर थेट रॉयल पाम कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वारापर्यंत मोठ्या प्रमाणावर झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. या अनधिकृत बांधकामांसाठी चक्क रस्त्यालगतच्या संरक्षक भिंती फोडून त्यातून काढलेल्या दगडांचाच वापर करीत झोपड्या बांधण्यात येत आहेत. या भागात अनेक झोपडीदादा सक्रिय असून राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नसल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.अतिशय पद्धतशीरपणे झोपडीदादांकडून हे अतिक्रमण केले जाते. सुरुवातीला मोकळ्या जागेत म्हशी बांधल्या जातात. काही दिवसांनी त्यांच्यासाठी शेड बांधली जाते. कालांतराने आजूबाजूने ताडपत्री लावल्या जातात आणि संधी मिळताच आतील बाजूंनी पक्के बांधकाम केले जाते. त्यानंतर म्हशी हटवून ती जागा राहण्यासाठी विकली जाते. काही ठिकाणी गाड्या पार्क करीत जागा अडवली जाते आणि नंतर तेथे पक्क्या खोल्या उभ्या राहतात, असे सांगण्यात येते. झोपडीदादांच्या या कारवाया खुलेआम सुरू असताना महापालिका आणि आरे प्रशासनही याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येतो. आजमितीस येथे दोनशेहून अधिक झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. झोपडीधारकांकडून रस्त्यालगत बेशिस्तपणे पार्किंग केले जाते. अनेक स्टॉलही उभारण्यात आले असून वाहनचालकांना त्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. येथील बांधकामासाठी झाडांचीही सर्रास कत्तल केली जाते. वृक्षराजींनी नटलेल्या शहरातील भागाला बेकायदा बांधकामांचे ग्रहण लागले असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत रहिवासी खंत व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
आरे कॉलनी झोपड्यांच्या विळख्यात
By admin | Updated: October 7, 2014 02:20 IST