Aaditya Thackeray's Jan Yatra will start from today | आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार
आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार

मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होईल. यात्रेच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत.

आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा आजपासून जळगावातून सुरू होणार आहे. या अंतर्गत ते जळगावमध्ये संवाद साधणार आहेत. त्यानंतर १९ तारखेला धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण, अहमदनगर आणि २२ तारखेला अहमदनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी येथील जनतेशी संवाद साधणार आहेत.

शिवसेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलने आणि संवाद यात्रांवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे. या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.

दरम्यान, राज्यात भाजपासोबत सत्तेत असलेली शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशा ताकीद शिवसेना नेत्यांकडून देण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी, त्यासाठी नाव कुणाचे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यातच आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे तर शर्यतीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 


Web Title: Aaditya Thackeray's Jan Yatra will start from today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.