Join us  

भांडुप-मुलुंडमध्ये नवे पूल बांधले जाणार 

By जयंत होवाळ | Published: April 03, 2024 6:31 PM

मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिका नवे पूल बांधणार असून त्यासाठी २१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई: मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिका नवे पूल बांधणार असून त्यासाठी २१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या भागातील काही पूल जुने झाले आहेत, तर काही पुलांची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले आहे. नव्या पुलांमुळे वाहतूक कोंडीही दूर होण्याची अपेक्षा आहे. मुलुंड पश्चिम येथील नाणेपाडा नाल्यावरील जुना पूल पाडून पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मुलुंड पश्चिमेकडील एल.एस. रोड आणि पूर्वेकडील शिव मंदिराजवळील पूल , त्याचप्रमाणे भांडुप येथील ऑक्सिजन नाल्याची पुनर्बांधणी होणार आहे. 

भांडुपकरांसाठी ऑक्सिजन पूल हा महत्वाचा आहे. भांडुप पूर्वेकडे जाण्यासाठी कोपरकर मार्ग हा एकमेव पर्याय आहे.  गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या जवळ ऑक्सिजन नाला पूल आहे.  या भागात तीव्र उतार आहे.  नाहूर पुलाच्या प्रस्तावित रुंदीकरणामुळे उतार  आणखी तीव्र होतो, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही  अडचण दूर करण्यासाठी रस्त्याची पातळी वाढवण्यात येणार आहे. या पुलांच्या कामासाठी  २१. ६९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी आर.ई .इन्फ्रा प्रा. ली. या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात पालिकेने विविध भागातील जुने पूल पाडून त्यांच्या पुनर्बांधणीचे  काम हाती घेतले आहे. विशेष करून  बहुसंख्य पूल हे त्या विभागाच्या अंतर्गत भागातील आणि नाल्यावरील आहेत. फार पूर्वी हे पूल बांधण्यात आले होते. त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी आवश्यक झाली आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका