Join us  

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून सुसंस्कृत चेहरा द्यावा, नागरिकांची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: April 21, 2024 4:10 PM

रवींद्र वायकर यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत.

मुंबई - उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) उपनेते अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप उत्तर पश्चिम मुंबईतील उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान, या मतदार संघात उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून माजी राज्यमंत्री आणि जोगेश्वरी पूर्व विधानसभेचे आमदार रवींद्र वायकर यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत. मात्र, रवींद्र वायकर यांना स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.

या मतदार संघातून माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत हे सुद्धा इच्छुक असून त्यांनी याबाबत अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती आणि त्यांचे परिचय पत्र दिले होते. दरम्यान, येथून सुसंस्कृत चेहरा हवा यासाठी पार्ले, जुहू, वर्सोवा, लोखंडवाला येथील सुमारे 30 प्रतिष्ठित नागरिकांनी आज दुपारी जूहू जिमखाना येथे डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यास आपल्या भागासाठी सुसंस्कृत चेहरा हवा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

याबाबत डॉ. दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीचा दुजोरा दिला. या मतदार संघातून आपण सुसंस्कृत चेहरा म्हणून उभे राहावे अशी नागरिकांनी मागणी केली. तसेच, शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काल उमेदवारी संदर्भात भेट घेतली होती. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा सर्वस्वी निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचे डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईदीपक सावंतमुंबई उत्तर पश्चिममहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४