Join us  

८० टक्के नोकऱ्या मराठी माणसाला नाही तर भूमिपुत्रांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:25 AM

नवाब मलिक यांचा खुलासा । पालकप्रेमी महासंमेलनात रंगला राजकीय वाद

मुंबई : महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम दरम्यान ८० टक्के भूमिपुत्रांना नोकºया देणार, असे जाहीर करण्यात आले असले तरी त्या ८० टक्के नोकºया या फक्त मराठी माणसांसाठी असणार नाहीत तर जे भूमिपुत्र म्हणून स्वत:ला सिद्ध करतील त्या सगळ्यांसाठी असणार असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला़

मराठी अभ्यास केंद्राने परळ येथील आऱ एम़ भट विद्यालयात पालकप्रेमी महासंमेलन आयोजित केले आहे़ या कार्यक्रमातील चर्चासत्रात निवेदिकेने नबाव मलिक यांनी महाआघाडीच्या घोषणांबाबत प्रश्न विचारला़ ८० टक्के नोकºया भूमिपुत्रांना दिल्या जाणार आहेत, यामध्ये मराठी माणसांची टक्केवारी किती असेल, असा प्रश्न नबाव मलिक यांना विचारण्यात आला़ भूमिपुत्रांसाठी ८० टक्के राखीव असतील, असे मलिक म्हणाले़ यामध्ये मराठी माणसासाठी किती जागा असतील, असा प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विचारला़ त्यावर मलिक यांनी वरील स्पष्टीकरण दिले़

नवीन सरकारच्या शैक्षणिक धोरणाविषयीची भूमिका विचारली असता सरकार मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करेल़ मात्र समाजात मातृभाषेतून शिक्षणाची जागृती होऊन आधी पालकांचा कल व ओढा मराठी शाळांकडे वाढायला हवा, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले. मराठी अभ्यास केंद्रामार्फत १४ आणि १५ डिसेंबर या दोन दिवसांमध्ये महासंमेलन होणार आहे. या दरम्यान मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार या चर्चासत्रादरम्यान शिवसेनेचे अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांना आमंत्रित करण्यात आले होते. नवाब मलिक यांनी आता आमच्या सरकारच्या काळात सीबीएससी, आयसीएससी बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करू, ज्या शाळा यासंदर्भातील नियम पाळणार नाहीत त्यावर कारवाईही करू, असे आश्वासनही दिले. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी आता आमचेच सरकार असल्याने पुढील पालक महासंमेलनापर्यंत मराठी शाळा आणि मराठी भाषेसाठी आम्ही ठोस पावले उचललेली असतील असे म्हटले़भाषा आणि संस्कृती जेवढ्या मुक्त असतील तेवढ्या टिकतील - नागराज मंजुळेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सतत शुद्धतेचा आग्रह धरणारी भाषा डबकं होते, ती आटत जाते. भाषा आणि संस्कृती जेवढ्या मुक्त असतील तेवढ्या टिकतील, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठीप्रेमी पालक महासंमेलनातील भाषणात व्यक्त केले.मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या उद्घाटनसत्रात दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत, अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे प्रमुख पाहुणे होते, तर अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर हे उद्घाटक होते.

दिग्दर्शक नागराज मंजुळे मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरताना म्हणाले की, मी समाजातल्या वंचित वर्गातला आहे, आमच्या भाषा समाजात अशुद्ध समजल्या गेल्याने आमच्या मुलांच्यात समाजात वावरताना व्यक्त होण्याचा, बोलण्याचा न्यूनगंड निर्माण होतो. सतत शुद्धतेचा आग्रह धरणारी भाषा डबकं होते, ती आटत जाते. भाषा हे माध्यम आहे, ज्ञान नव्हे.आपल्या समाजात इंग्रजी येत नाही याची लाज वाटते, पण भारतातल्या इतर प्रादेशिक भाषा आपल्याला येत नाहीत, याबद्दल आपल्याला कधीच लाज वाटत नाही. मग इंग्रजीबाबत ही लाज का आणि कशी निर्माण होते, असा सवाल त्यांनी विचारला.तर अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी मराठीतून शिक्षणाचा प्रसार ही सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला शह देणारी गोष्ट आहे, असे म्हणत ज्ञानेश्वरी आणि तुकारामांच्या अभंगांचे दाखले दिले. चांगली मराठी बोलण्यापेक्षा चुकीचे इंग्रजी बोलणाºयांना सध्या समाजात प्रतिष्ठा लाभत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

खासदार अरविंद सावंत यांनी लोक बाजारपेठेतल्या मागणीमुळे इंग्रजीला जवळ करतात, त्यांचे इंग्रजीवर प्रेम नसते. मात्र त्यामुळे आजही मराठी मंत्रालयाबाहेर फाटक्या वस्त्रात उभी आहे, असे उद्गार काढले.