Join us  

राज्यात पहिल्या दिवशी ६४ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:07 AM

१८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लसीकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. राज्यातील ...

१८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. राज्यातील २८५ केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यातील सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर अन्य केंद्रांवर सिरमची कोविशिल्ड ही लस देण्यात आली. राज्यात पहिल्याच दिवशी सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, याचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे.

राज्यात दिवसभरात मुंबईत सर्वाधिक लसीकरण करण्यात आले. मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी लसीकरण मोहिमेचा आरंभ करण्यात आला. दिवसभरात लसीकरण मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते. राज्यात कोणत्याही लसीकरण केंद्रावर लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

- ॲपमध्ये तांत्रिक अडचण

राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. लसीकरण प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना नोंदणी क्रमांक देण्यात आला होता. हा क्रमांक पडताळून ओळखपत्राची माहिती घेऊन स्वाक्षरीनंतर लसीकरण करण्यात येत होते.

- सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलडाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदुर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०)

- आज म्हणजे रविवारी लसीकरण नाही

केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. त्यामुळे रविवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

.........................