Join us  

६२२ चालक, ७०६ वाहकांची अत्यावश्यक सेवाला दांडी; कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 9:47 PM

अत्यावश्यक सेवेमध्ये मुंबई, ठाणे, कुर्ला नेहरू, परळ, पनवेल, उरण ६२२ चालक आणि ७०६ वाहक दांडी मारत आहेत.

मुंबई : लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून बस सेवा दिली जाते. मात्र एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा देण्यासाठी दांडी मारत असल्याने हि सेवा कमी पडत आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मुंबई, ठाणे, कुर्ला नेहरू, परळ, पनवेल, उरण ६२२ चालक आणि ७०६ वाहक दांडी मारत आहेत. कर्मचाऱ्याच्या मनात कोरोनाची भीती असल्याने कामावर रुजू होत नाहीत. दरम्यान, कर्मचारी कर्तव्यावर येत नसल्याने कारवाईचे सत्र सुरु झाले आहे.

एसटी महामंडळाकडून मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. मात्र या विभागातील कर्मचारी कर्तव्यावर येत नसल्याने एसटी सेवेची कमतरता भासत आहे. एसटी महामंडळातील या तीन विभागातील एकूण २१ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

लॉकडाउन काळात अत्यावशक सेवा अपुरी पडत असल्याने एसटी महामंडळाने राज्यभरातील चालकांना बोलविण्यात आले होते. मात्र तरीही, मुंबई, पालघर, ठाणे विभागातील कर्मचारी कोरोनाच्या भीतीने कर्तव्यवावर आले नाहीत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालक-वाहकांना करोनाची लागण होऊ नये, यासाठी मास्क, सॅनिटायझर दिले आहे. याशिवाय त्यांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ताही जाहीर केला आहे. तरीही अत्यावश्यक सेवा देण्याऐवजी अनेकांनी कोरोनाच्या भीतीने या सेवेकडे पाठ फिरवली आहे. दांडी मारणाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी, तसेच हंगामी व रोजंदारीवरील एसटी चालक, वाहक आणि चालक तथा वाहकांचा समावेश आहे. जे चालक-वाहक गैरहजर राहिले आहेत, यातील काहींचे वेतन थांबवण्याची कारवाई महामंडळाने केली आहे. यामध्ये हंगामी आणि रोजंदारीवर असलेल्यांवर बडतर्फीचाही बडगा उचलण्याचा विचार महामंडळाकडून सुरु आहे.