Join us  

एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून ६०० कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:06 AM

मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकार ६०० कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब ...

मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकार ६०० कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात १५ एप्रिलपासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी केवळ ५० टक्के क्षमतेने एसटी प्रवासाचे बंधन होते. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. एसटीला दैनंदिन खर्च भागविणेही शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर एसटीला मदत करण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनंदिन खर्चासाठी पहिल्या टप्प्यात ६०० कोटी देण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केले. या बैठकीला राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वीदेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने एक हजार कोटी एसटी महामंडळाला दिले होते. त्यातून गेली सहा महिने एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले.