Join us  

हागणदारीमुक्त रुळाचे ६० टक्के काम पूर्ण, ३५ हजार बोगींमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 5:41 AM

स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे उपक्रमांतर्गत रेल्वेच्या सर्व बोगींमध्ये बायोटॉयलेट बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यानुसार सद्य:स्थितीत ३५ हजार बोगींमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित केल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली. स्वच्छ रेल्वे अंतर्गत एकूण ५५ हजार बोगींंमध्ये २०१९ अखेर एकूण २.२ लाख बायोटॉयलेट यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

मुंबई - स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे उपक्रमांतर्गत रेल्वेच्या सर्व बोगींमध्ये बायोटॉयलेट बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यानुसार सद्य:स्थितीत ३५ हजार बोगींमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित केल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली. स्वच्छ रेल्वे अंतर्गत एकूण ५५ हजार बोगींंमध्ये २०१९ अखेर एकूण २.२ लाख बायोटॉयलेट यंत्रणा बसविण्यात येणार आहे.मानवी विष्ठेतील अ‍ॅसिडमुळे रेल्वे रुळांवर रासायनिक परिणाम होतात, तसेच अस्वच्छता पसरते. यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व मेल-एक्स्प्रेस बोगीत बायोटॉयलेट बसविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार देशातील तब्बल ३५ हजार बोगींमध्ये १.३ लाखांहून अधिक बायोटॉयलेट यंत्रे कार्यान्वित केली आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक अमित गर्ग यांनी दिली. यात मध्य रेल्वेवरील एक हजार आणि पश्चिम रेल्वेवरील ७५० बोगींमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेत सद्य:स्थितीत ५५ हजार बोगी कार्यरत आहेत. या बोगींसाठी एकूण २.२ लाख बायोटॉयलेट यंत्रणेची आवश्यकता आहे. मार्च २०१९ अखेर सर्व बोगींमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक असलेल्या या यंत्रणेमुळे रेल्वे रूळ स्वच्छ राखण्यास मदत होणार आहे. भारतीय रेल्वेतील काही रेल्वे स्थानकांवरदेखील रेल्वे प्रशासनाने बायोटॉयलेट कार्यान्वित केले आहे. बायोटॉयलेट यंत्रणेमुळे पाण्याचीदेखील बचत होणार आहे.

 

टॅग्स :भारतीय रेल्वेबातम्या