Join us  

गुन्हे मालिका पाहून केली ५८ लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 5:27 AM

गुन्हे मालिका पाहून लुटारूंनी पायधुनीतील कारखान्यात आयकर विभागाचे अधिकारी बनून टाकलेल्या छाप्यात, ५८ लाखांची लूट केल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : गुन्हे मालिका पाहून लुटारूंनी पायधुनीतील कारखान्यात आयकर विभागाचे अधिकारी बनून टाकलेल्या छाप्यात, ५८ लाखांची लूट केल्याचे उघडकीस आले आहे. लूट केलेले हिरे, दागिने झवेरी बाजारात विकण्यासाठी प्रयत्न करत असताना, ते गुरुवारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कारखान्यातील एका कारागिरासह ५ जणांचा अटक आरोपींत समावेश आहे.नीलेश परशुराम आरेकर (२५), विजय उर्फ विशाल चव्हाण (३६), सुनील जोसेफ फेराव (२४), सागर रामभाऊ वाघ (२२), लक्ष्मण उमाजी भोसले (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी पायधुनी येथील मनोज सामंतो यांच्या कारखान्यात तोतया आयकर विभागाचे अधिकारी बनून छापा टाकत, ५८ लाखांचे दागिने पळविले होते. यातील लक्ष्मण हा गेल्या ५ महिन्यांपासून सांमतो यांच्याकडे नोकरी करतो. नीलेश हा त्याचा रायगडचा मित्र. नीलेशवर यापूर्वी रायगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नीलेशला गुन्हे मालिका, चित्रपट पाहण्याची आवड होती. यातूनच त्याने लक्ष्मणला झटपट श्रीमंत होण्यासाठी कारखान्यात लूट करण्याच्या योजनेबाबत सांगितले. लक्ष्मण त्यासाठी तयार होताच, त्यांनी आणखी ३ मित्रांना यासाठी तयार केले. त्यांचा एक मित्र पोलीस अधिकाºयासारखा दिसत असल्याने, नीलेशने आयकर आणि गुन्हे शाखेच्या अधिकाºयांच्या नावे कारखान्यावर छापा टाकायचे ठरविले. मालकाची येण्या-जाण्याची वेळ, तसेच कारखान्यातील सीसीटीव्हीबाबत लक्ष्मणला माहिती होते. त्यानुसार, आठवडाभर सर्व बाबींचा नीट अभ्यास करून, २४ तारखेला नियोजनानुसार ५ आरोपींपैकी दोघांनी मालक येण्याच्या आधीच कारखान्यात आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून छापा टाकला. ‘तुम्हारे सेठने २०० सौ करोड का गफला किया है, उसके डोंबिवली के घर में से ८० लाख गोल्ड मिला है’ असे सांगत, कारखान्यातील सामानांच्या तपासणीच्या बहाण्याने, ५८ लाखांचे दागिने पळविल्याचे तपासात समोर आले आहे.आरोपींनी सीसीटीव्ही सोबत चोरून नेल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान होते. कारखान्यातील कारागिरांच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते. त्यांनी झवेरी बाजारातील खबरी कामाला लावले होते. बुधवारी काही जण झवेरी बाजारात दागिने विक्रीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरिक्षक विजयसिंह भोसले, सपोनि राहुल भंडारे, सुहास माने, दत्तात्रय सानप, पोलीस उपनिरिक्षक लिलाधर पाटील, प्रवीण फडतरे, स्वप्निल शिंदे आणि अंमलदार यांच्या पथकाने शिताफीने गुरुवारी पाचही जणांना पोलिसांनी अटक केली.>४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगतलुटारूंकडून पोलिसांनी ४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, तसेच अन्य दागिन्यांबाबतही पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.