Join us  

रस्त्यांची ५४० कामे पावसाळ्यानंतर; मान्सूनपूर्व सरींनी दाणादाण उडविल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:01 AM

मान्सूनपूर्व पावसाने मुंबईला पावसाळ्यातील गैरसोयींचे ट्रेलर दाखविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत संध्याकाळी अचानक हजेरी लावून पावसाने दाणादाण उडविल्याने पावसाळापूर्व कामे आटोपण्यासाठी महापालिकेसाठी शेवटची संधी उरली आहे.

मुंबई : मान्सूनपूर्व पावसाने मुंबईला पावसाळ्यातील गैरसोयींचे ट्रेलर दाखविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत संध्याकाळी अचानक हजेरी लावून पावसाने दाणादाण उडविल्याने पावसाळापूर्व कामे आटोपण्यासाठी महापालिकेसाठी शेवटची संधी उरली आहे. मात्र तब्बल ५४० रस्त्यांची कामे आता पावसाळा संपेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहेत.खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिकेने प्राधान्यक्रम ठरवून रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर आॅक्टोबरपासून १६८० रस्त्यांच्या कामांचे नियोजन करण्यात आले. आठ महिन्यांच्या कालावधीत यापैकी १११९ रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. मात्र सुमारे ५४० रस्त्यांची कामे आता आॅक्टोबर महिन्यातच पुन्हा सुरू होणार आहेत.मुंबईत महापालिकेबरोबरच मेट्रो रेल्वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आदींची विकासकामे सुरू आहेत. या खोदकामांमुळे पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करण्याची मुदत महापालिकेने संबंधितांना दिली होती. मात्र वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्यास दिरंगाई,निविदा प्रक्रियेला विलंब यामुळे पालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांची कामे रखडली.विलंबासकारण की...काही रस्ते कामांच्या निविदा एप्रिल महिन्यात काढण्यात आल्या. तसेच रस्त्यांच्या कामासाठी वाहतूकपोलिसांची परवानगी घ्यावी लागते.मात्र योग्य खबरदारी घेतली असल्याने पावसाळ्यात या कामामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, असा दावा एका पालिका अधिकाऱ्याने केला.यांना कारवाईचा बडगा : मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. या खोदकामांमुळे अनेकवेळा पादचारी व वाहन चालकांची गैरसोय होते. तसेच अपघाताचाही धोका असतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी हा नियम मोडण्यात येत असल्याने ठेकेदारांना कारवाईचा बडगा दाखविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. या कारवाई अंतर्गत पूर्व उपनगरातील ठेकेदाराला ३४ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.अडीच हजार टन कोल्डमिक्सपावसाळ्यात खड्ड्यात जाणारे रस्ते भरण्यासाठी महापालिकेने या वर्षी आपल्याच कारखान्यात कोल्डमिक्स मिश्रण तयार केले आहे. सुमारे अडीच हजार टन कोल्डमिक्स मिश्रणाची तयारी महापालिकेने ठेवली आहे. मात्र गरजेनुसारच त्याचा वापर होणार आहे.

टॅग्स :मुंबई