मुंबई : देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, पुरुषांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर वर्षभरातच ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होत असून, दारू, तंबाखूचे सेवन ही कर्करोग होण्याची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. देशात दरवर्षी मुखाच्या कर्करोगाचे नव्याने १ लाख रुग्ण आढळून येतात. पुढल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढणार आहे. मुखाच्या कर्करोगानंतर घशाच्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या २००८च्या अहवालात हेड अॅण्ड नेक कर्करोगाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. सद्य:स्थितीमध्ये पुरुषांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण जास्त असून, महिलांमध्ये हा कर्करोग तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे डॉ. पी.सी. गुप्ता यांनी सांगितले. मुखाचा, घशाचा कर्करोग हा टाळता येण्यासारखा आहे. तंबाखू, दरू सेवनामुळे या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तंबाखू, दारू सेवन टाळल्यास भविष्यात होणारा कर्करोग सहजच टाळता येऊ शकतो, असे टाटा रुग्णालयाचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले. ते म्हणाले, मुखाचा अथवा घशाच्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा होऊ शकतो. पण, अनेकदा या कर्करोगाचे निदान उशिरा होते. त्यामुळे गुंतागुंत वाढलेली असते. अनेकदा रुग्णांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. मात्र कर्करोग झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा तो टाळणे गरजेचे आहे. कर्करोग टाळायचा असल्यास तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे आवश्यक आहे. राज्यात गुटखा बंदी लागू असल्यामुळे गुटखा विक्रीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. परंतु अजूनही गुटखा, पानमसाला, तंबाखूचे सेवन केले जाते. तरुण वयात हे व्यसन लागल्यास ऐन उमेदीच्या काळात त्या व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका वाढतो. (प्रतिनिधी)
५० टक्के रुग्णांचा वर्षातच मृत्यू
By admin | Updated: July 27, 2015 02:21 IST