मुंबई : घरगुती वीज ग्राहकांसाठी छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे वीज बिलात बचत होणार आहे. शिवाय नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर हीच शिल्लक वीज विकत घेतली जाणार आहे.
केंद्राच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोनअंतर्गत २५ मेगावॅटचे उद्दिष्ट मंजूर झाले. योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्राकडून वित्त सहाय्य देण्यात येणार आहे. घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे. रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर आहे, अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
-------------------
पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी प्रतिकिलोवॅट किंमत
१ किलोवॅट - ४६,८२०
१ ते २ किलोवॅट - ४२,४७०
२ ते ३ किलोवॅट - ४१,३८०
३ ते १० किलोवॅट - ४०,२९०
१० ते १०० किलोवॅटसाठी ३७,०२० रुपये
-------------------
- ३ किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची १ लाख २४ हजार १४० रुपये किंमत राहील.
- त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९ हजार ६५६ रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल.
- संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात ७४ हजार ४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल.
-------------------
रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर
- दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा ५५० रुपयांची बचत होऊ शकेल.
- यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल.
- त्याचा आर्थिक फायदा घरगुती ग्राहकांना होणार आहे.