Join us  

‘आरपीएफ’मुळे प्रवाशाला परत मिळाले ४ लाखांचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:07 AM

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बाेरिवली स्थानकात बॅगेचा रंग सारखा असल्यामुळे एका महिला प्रवाशाची बॅग बदलली हाेती. या बॅगेत ...

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बाेरिवली स्थानकात बॅगेचा रंग सारखा असल्यामुळे एका महिला प्रवाशाची बॅग बदलली हाेती. या बॅगेत सुमारे चार लाखांचे दागिने आणि वस्तू हाेत्या. आरपीएफने याबाबत तात्काळ कारवाई करून त्या महिलेला तिची बॅग सामानासह सुपूर्द केली.

२५ जुलै राेजी चेन्नईच्या रहिवासी असलेल्या नेहा निर्मल जैन या प्रवासी ०४७०७ बिकानेर-दादर स्पेशल ट्रेनने प्रवास करीत हाेत्या. त्या बाेरिवली स्थानकात उतरल्यानंतर त्यांच्या आणि एका दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेचा रंग सारखाच असल्याने बॅगेची अदलाबदल झाली. जैन यांची दागिन्यांची काळ्या रंगाची बॅग दुसरा प्रवासी चुकून घेऊन गेला. आपण घेतलेली बॅग आपली नसल्याचे लक्षात आल्यानंतर नेहा यांनी तात्काळ बाेरिवली स्थानकातील आरपीएफ जवानांना याची माहिती दिली. आरपीएफने स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका प्रवाशाने ती बॅग स्थानकातील हमालाद्वारे पूर्व दिशेच्या पार्किंगमधील एका वाहनात ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर आरपीएफने त्या गाडीचा शाेध घेऊन गाडीचे मालक खार येथील रहिवासी जागरण जैन यांना स्थानकात बाेलावून, नेहा यांना त्यांची दागिन्यांची बॅग परत मिळवून दिली. त्या बॅगेत ३ लाख ७५ हजारांचे दागिने, ५ हजार रुपये राेख आणि ४ हजारांचे घड्याळ असा एकूण ३ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज हाेता.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई आरपीएफद्वारा २०२१ मध्ये ३७६ प्रवाशांना त्यांचे विसरलेले ५३ लाखांचे सामान परत केले आहे.