Join us  

मानखुर्दच्या एकता नगरमध्ये आग, ४ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मानखुर्दच्या मार्ग क्रमांक १ येथील एकता नगर परिसरात बुधवारी दुपारी तीन घरांना आग लागली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मानखुर्दच्या मार्ग क्रमांक १ येथील एकता नगर परिसरात बुधवारी दुपारी तीन घरांना आग लागली. दुपारी एकच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाने तातडीने दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. एकता नगर हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर अग्निशमन दलाने साडेचारच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये घरांमधील वस्तूंचे काही प्रमाणात नुकसान झाले असून चार जणांना सौम्य इजा झाली. नताशा नायडू (७), पायल मिश्रा (४ महिने), सुनीता मिश्रा (२६) आणि गौरी जयस्वाल (११) या चौघी जणींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी मानखुर्दमधील केमिकलच्या अवैध गोदामांना भीषण आग लागली होती. मानखुर्दमध्ये वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.