२०२२ ला काम पूर्ण होणार : प्रवाशांचा वेळ वाचणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेले मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ३५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २०१८ साली सुरू झालेले हे काम सप्टेंबर २०२२ साली पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा मार्ग नवी मुंबई, रायगड, मुंबई, पुणे महामार्गाला जोडला जाईल.
एमटीएचएल, शिवडी-वरळी उन्नत मार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर, मीरा-भाईंदर कोस्टल रोड या प्रकल्पांद्वारे येत्या दहा वर्षांत महानगर क्षेत्रात रिंगरूट तयार होणार असून यावरून विनासिग्नल प्रवास करता येईल
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी शुक्रवारी लिंकचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या वेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनाकाळात काम विलंबाने होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लिंकचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. कोरोनाकाळात कामगारांची सुरक्षा यावर भर देण्यात येत आहे. सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लिंकचे काम ३५ ते ४० टक्के झाले असून, हे काम करताना पर्यावरणाची काळजी घेण्यात येत आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शिवाय इंधन वाचणार आहे. याव्यतिरिक्त मुंबईचा वेग वाढणार आहे. मुंबईतून नवी मुंबईला जाणे आणि येणे सोपे होणार आहे. थोडक्यात प्रवास वेगवान होणार आहे.
आर.ए. राजीव यांनीदेखील काम वेगाने सुरू असल्याचा दावा केला. काम ३५ ते ४० टक्के पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. मुळात हे काम २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि एकदा का हे काम पूर्ण झाले तर भविष्यात मुंबईचा वेग वाढणार आहे. प्रवास वेगवान होणार आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना टोल आकारण्यात येईल. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी याबाबतचा निर्णय होईल.
१६.५ किलोमीटर सागरी पूल
५.५ किलोमीटर पूल जमिनीवर
नवी मुंबई विमानतळालाही हा मार्ग जोडण्यात येणार
फ्लेमिंगोंसाठी साउंड बॅरिअर लावणार
भारतात तसेच जगातला सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू
जपानच्या कंपनीचे ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञानाचा वापर
एकूण प्रकल्प किंमत : १७ हजार ८४३ कोटी
एकूण लांंबी : २२ किमी