Join us  

उच्च शिक्षण संस्थांना ‘रुसा’कडून ३४० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:02 AM

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषदेने (रुसा परिषद) राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा बृहत आराखडा तयार केला असून, विविध शिक्षण संस्थांना ३४० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने मंजूर केले आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान परिषदेने (रुसा परिषद) राज्याच्या उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठीचा बृहत आराखडा तयार केला असून, विविध शिक्षण संस्थांना ३४० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने मंजूर केले आहे.आराखड्यामध्ये महाविद्यालयांची स्वायत्तता, स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देणे, महाविद्यालयांच्या गटाला क्लस्टर (समूह) विद्यापीठाचा दर्जा देणे, संशोधन, नवोपक्रम, अध्ययन, अध्यापनाच्या पद्धतीतील गुणवत्ता वाढ मूल्यमापनाच्या नवनवीन पद्धती आदींवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दिली.देशातून स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा फक्त तीन महाविद्यालयांना देण्यात येणार होता. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाकरिता ५५ कोटी रुपये अनुदान देण्याची योजना होती. फर्ग्युसन महाविद्यालय (पुणे) हे भारतातील पहिल्या तीनमध्ये आले. महाराष्ट्राचा समूह विद्यापीठाचा सुधारित प्रस्ताव मान्य करण्यात आला. या समूह विद्यापीठामध्ये इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स हे अग्रणी (लीड) महाविद्यालय असेल आणि इतर सहभागी महाविद्यालयांमध्ये सिडनहॅम महाविद्यालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा समावेश आहे. या समूह विद्यापीठाला डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठ असे नाव देण्यात आले असून, यासाठी केंद्र सरकारकडून ५५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन, एनआयआरएफ रँकिंग व संशोधनातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे या विद्यापीठाला संशोधन, नवोपक्रम व गुणवत्ता विकास या घटकासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.इतर घटकांमधील अनुदानामध्ये पायाभूत सुविधांसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक या विद्यापीठांना प्रत्येकी २० कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. संत तुकारामजी जाधव सायन्स अ‍ॅण्ड कॉलेज वाशिम तसेच ग्रामविकास संस्था आर्ट्स कॉलेज, नंदुरबार या दोन नवीन मॉडेल महाविद्यालयांसाठी १२ कोटी रुपये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम या व्यावसायिक महाविद्यालयासाठी २६ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. धनंजयराव गाडगीळ कॉलेज, सातारा व छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस अ‍ॅण्ड रिसर्च कोल्हापूर या स्वायत्त महाविद्यालयांना प्रत्येकी५ कोटी रुपये गुणवत्ता विकास वदर्जा सुधार या घटकांतर्गत देण्यात आले.स्वायत्त महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या योजनेमध्येपहिल्या ६ महाविद्यालयांपैकी महाराष्ट्रातील चार महाविद्यालयांचा समावेश झाला आहे. अन्य ३ महाविद्यालयांमध्ये सेंट झेवियर्स, सिम्बायोसिस महाविद्यालय व मिठीबाई महाविद्यालय यांचा समावेश आहे. सध्या या महाविद्यालयांना प्रतीक्षा यादीत ठेवले आहे.